IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
IPL 2025 : लखनौ सुपर जायंटसचे मालक संजीव गोएंका आणि रिषभ पंत यांच्या संवादानं अनेकांना गोएंका आणि केएल राहुल यांच्यातील संवादाची आठवण झाली.

नवी दिल्ली : आयपीएलचं 18 वं पर्व सुरु झालं असून लखनौ सुपर जायंटसचे मालक संजीव गोएंका सुरुवातीलाच चर्चेत आले आहेत. लखनौ आणि दिल्ली यांच्यातील लढतीत रिषभ पंतच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. लखनौनं त्यांच्या हातात असलेली मॅच गमावल्यानंतर संजीव गोएंका आणि लखनौचा कॅप्टन रिषभ पंत यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तर्क वितर्क सुरु झाले होते.
लखनौ आणि दिल्ली यांच्यातील मॅचचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला. लखनौ मॅच जिंकेल अशी स्थिती असतानाच दिल्लीच्या आशुतोष शर्मानं 66 धावांची वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या ओव्हरमध्ये रिषभ पंतनं मोहित शर्माला बाद करण्याची संधी गमावली. दिल्लीच्या 9 विकेट गेल्या होत्या. अखेरची विकेट काढली असती तर लखनौला पहिला विजय मिळाला असता. मात्र, लखनौला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर रिषभ पंत, प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि संघाचे मालक संजीव गोयंका चर्चा करताना दिसून आले.
संजीव गोयंका यांचा केएल राहुल यासोबतचा एक व्हिडिओ देखील यापूर्वी व्हायरल झाला होता. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये लखनौच्या पराभवामुळं संजीव गोयंका केएल राहुलवर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी राहुल संजीव गोयंकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करताना मध्येच थांबायचा ते दिसून आलं होतं. त्यावेळी क्रिकेट चाहत्यांनी संजीव गोयंकांचं वर्तन योग्य नसल्याचं म्हटलं होतं.
लखनौ सुपर जायंटसचा संघ आयपीएलमध्ये 2022 पासून सहभागी झाला आहे. तेव्हापासून पहिल्या तीन हंगामात केएल राहुल कॅप्टन होता. केएल राहुलच्या नेतृत्त्वात लखनौचा संघ प्लेऑफ पर्यंत पोहोचला होता. तर, आयपीएलच्या 17 व्या हंगामात लखनौला लीग स्टेजमधून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर लखनौनं केएल राहुलला रिटेन न करता रिषभ पंतला 27 कोटी रुपये मोजून संघात घेत त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं.
रिषभ पंतच्या नेतृत्त्वात लखनौला पहिला विजय मिळवता आला नाही. लखनौ विजयाच्या जवळ असताना रिषभपच्या एका चुकीमुळं त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळं नाराज झालेले संजीव गोयंका मैदानावर आले आणि त्यांनी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यासह रिषभ पंतसोबत चर्चा केली. मात्र, यावेळी ते गेल्या वर्षी इतके नाराज झाले नव्हते. संजीव गोयंका मैदानावर आल्यानं एक प्रश्न निर्माण झाला की आयपीएलमधील संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंना रागवू शकतात का?
बीसीसीआयचा नेमका नियम काय?
आयपीएल फ्रँचायजीच्या मालकांसाठी काही नियम आहेत.उत्पन्नाचा किती वाटा त्यांना मिळेल, टीमचं व्यवस्थापन कसं करावं, या संदर्भात नियम आहेत. मात्र, संघाच्या मालकांनी खेळाडूंशी कशी चर्चा या संदर्भातील नियम स्पष्ट नाहीत. मात्र, संघमालकांनी खेळाडूंसोबत सभ्यपणे वर्तन करावं, अशी अपेक्षा असते. संघाच्या खराब कामगिरीमुळं संघमालक नाराज होणं साहजिक आहे मात्र खेळाडूंवर राग काढणं चुकीचं आहे.
इतर बातम्या :





















