
Nitin Gadkari : शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात : नितीन गडकरी
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं.

Nitin Gadkari : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. तसेच शेतकऱ्यांनी कृषी उत्पादक कंपन्या (gricultural production companies) स्थापन कराव्यात असेही गडकरी म्हणाले. कृषी क्षेत्रात नव्याने येणारे तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरातून शेतकऱ्यांनी केलेल्या यशोगाथा सर्वांसमोर जाणं आवश्यक आहे. तसेच निर्यातीसाठी आपले उत्पादन तंत्रज्ञान वापरुन अधिक सक्षण करावं लागेल असंही गडकरींनी सांगितले.
अॅग्रो व्हिजन फाऊंडेशन आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत कृषी आणि प्रक्रीयायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सेंटर पॉर्इंट हॉटेल इथे 'विदर्भातील फळे व भाजीपाला तसेच कृषी उत्पादनात निर्यातीची संधी' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. निर्यातीसाठी आपले उत्पादन आवश्यक तेवढे सक्षम नाही, याचा विचार करुन त्यात तंत्रज्ञान वापरुन निर्यातक्षम करावे लागेल. त्यासाठी पैसा अधिक लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होऊन कृषी उत्पादक कंपन्या उभाराव्या. त्यामाध्यमातून एकत्रितपणे हे सर्व करणे शक्य होईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
उत्पादन खर्च कमी करुन उत्पादनात वाढ करणं गरजेचं
सध्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ कमी करुन उत्पादनात वाढ करणे सध्या काळाची गरज असल्याचं गडकरींनी सांगितलं. स्वस्त निर्यातीसाठी ड्रायपोर्टवरुन थेट बांगलादेश येथे निर्यातीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी देखील अधिक स्मार्ट होत तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
नवोदित कृषी विद्यार्थ्यांना निर्यातीसाठी आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करावा, असे मत अॅग्रो व्हिजनचे डॉ. सी. डी. मायी यांनी व्यक्त केले. आनंदराव राऊत यांनी, कृषी क्षेत्रातील यशोगाथांची माहिती देत, निर्यातक्षम दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करण्याचे आवाहन केले. तर रवींद्र ठाकरे यांनी, निर्यातक्षमता वाढवण्यासाठी एपिडाचे एक केंद्र नागपुरात असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी निर्यात करताना खरेदीदार देशाच्या मागणीनुसार दर्जेदार उत्पादन करणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
