Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असणार का असं विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत वाट पाहावं असं म्हटलं.
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेतली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली असून उद्या सायंकाळी साडे पाच वाजता शपथविधी आहे. देवेंद्रजींनी आपल्याला निमंत्रण दिलं आहे. मी देखील तुम्हाला आमंत्रित करतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी इथंच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही दिलं आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भाजपच्या उमेदवाराला, देवेंद्रजींना देऊन टाकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा जो निर्णय घेतील त्यांना पाठिंबा असेल अशी भूमिका मी यापूर्वीच घेतली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता, त्यामुळे मी अगदी मनमोकळेपणानं माझी भूमिका स्पष्ट केली, असं शिंदेंनी म्हटलं.
अतिशय खेळीमेळीच्या आनंदात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद आहे. खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी राज्यातले सर्व घटक या राज्यातल्या प्रत्येक मतदारानं महायुतीवर मतांचा वर्षाव केला. ऐतिहासिक आणि दैदिप्यमान यश महायुतीला मिळालं. यामध्ये मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामाचा वाटा आहे. सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं, मतदारांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
महाविकास आघाडीनं जी विकासकामं थांबवली होती. जे प्रकल्प आवश्यक होते, महाराष्ट्राला 10-20 वर्ष मागं नेणारे निर्णय महाविकास आघाडीनं घेतले होते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजनांची सांगड घातली. आमची जबाबदारी वाढलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस करण्याची संधी मिळाली याचाही आनंद आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला मंत्रिमंडळात सहभागी व्हावं असं म्हटलंय, असं विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी सांगतो, एकदमचं पाहिजे का सगळं असं म्हटलं. यावेळी अजित पवार यांनी थोडी कळ काढा, असं म्हटलं. देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो, महायुतीचे आमदार आहेत सगळ्यांना धन्यवाद देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एवढे आम्ही निर्णय घेतले की ते सर्व निर्णय ऐतिहासिक होते, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेबाबत विचारलं असते ते संध्याकाळपर्यंत वाट पाहा असं म्हटलं. यावर अजित पवार यांनी सायंकाळपर्यंत त्यांचं कळेल मी तर शपथ घेणार आहे, असं म्हटलं. यावर एकनाथ शिंदे यांनी अजित दादांना सकाळी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव असल्याचं म्हटलं. यावर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पण सकाळी शपथ घेतली होती, असं म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी सगळं कन्फ्युजन दूर होईल, असं म्हटलं.
इतर बातम्या :