Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Rahul Narwekar : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची पुन्हा निवड केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस उद्या शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी भाजपच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या भेटीला गेले आहेत. या घडामोडी सुरु असतानाच महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण असणार याबाबतची माहिती समोर आली आहे. विधानसभेचं अध्यक्षपद पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे दिलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष होणार?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बहुमत मिळवलं. भाजपला 132, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला 41 जागांवर विजय मिळाला. मित्रपक्षांसह महायुतीचं संख्याबळ 236 इतकं झालं आहे. महायुतीकडे मोठं संख्याबळ असल्यानं विधानसभा अध्यक्ष तीन पक्षांमध्ये कुणाकडे जाणार याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा भाजपकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष भाजपनं त्यांच्याकडे घेतलं होतं. भाजपनं त्यावेळी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबरला
महाराष्ट्राच्या विधानसभेत नव्या सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडावा लागेल. त्याशिवाय आमदारांचा शपथविधी सोहळा, विधानसभा अध्यक्षांची निवड यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यासाठी 7,8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे. 7 आणि 8 डिसेंबरला सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर उद्या नव्या सरकारची स्थापना म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.
इतर बातम्या :