ENG vs NZ ICC Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडची आयसीसी वन डे विश्वचषकात दणदणीत विजयी सलामी
सलामीचा डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रनं झळकावलेल्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं आयसीसी वन डे विश्वचषकात दणदणीत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडनं सलामीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा नऊ विकेट्स आणि ८२ चेंडू राखून धुव्वा उडवला. न्यूझीलंडनं या विजयासह गत विश्वचषकाच्या फायनलमधल्या तांत्रिक पराभवाचा वचपा काढला. आजच्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला नऊ बाद २८२ धावांत रोखलं होतं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रनं दुसऱ्या विकेटसाठी २७३ धावांची अभेद्य भागीदारी रचून न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कॉनवेनं १२१ चेंडूंत १९ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १५२ धावांची, तर रवींद्रनं ९६ चेंडूंत ११ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद १२३ धावांची खेळी उभारली. त्याआधी, न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं तीन, तर मिचेल सॅन्टनर आणि ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.