Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Kunal Kamra Video On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra Video) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून एकनाथ शिंदेंविरोधात त्याने केलेल्या एका गाण्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं असून एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली आहे. त्यामुळे कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने एक गाणं म्हटल्याचं दिसून येतंय. या गाण्यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटलं आहे. घराणेशाही संपवण्यासाठी यांनी कुणाचातरी बाप चोरला असंही त्यामध्ये म्हटलं आहे. मंत्री नाही तर हे दलबदलू आहेत. मंत्रालयापेक्षा जास्त हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवरच जास्त असतात अशीही टीका त्यामध्ये करण्यात आली आहे.
कुणाल कामराचं हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. कामराचा हा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे.
कुनाल की कमाल!
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 23, 2025
जय महाराष्ट्र! https://t.co/U4Jxdo4dCm
शिंदेंचे कार्यकर्ते आक्रमक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून व्यंगात्मक टीका केल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते हे कुणाल कामराच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुणाल कामराचे हे गाणं एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारं असल्याचं मत शिंदे गटाकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी असा एक मतप्रवाह आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बदनामीकारक गाणं असेल तर ते सहन करणार नाही असा इशारा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
या आधीही कुणाल कामरा हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामीला ट्रोल केल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. तसेच कुणाल कामराने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर त्याच्या कार्यक्रमातून टीका केली आहे.
ही बातमी वाचा:
























