Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या
झीरो अवरच्या तिसऱ्या सत्रात आपलं स्वागत
राग हा सर्वात झपाट्यानं पसरत चाललेला सामाजिक रोग बनत चाललाय का, असा प्रश्न पडतो. कारण अतिशय किरकोळ आणि क्षुल्लक कारणांवरून लोक एकमेकांचा जीव घेऊ लागलेत.
बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात आज बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची त्याच्याच वर्गातील मुलानं कोयत्यानं वार करून निर्घृण हत्या केली. मृत विद्यार्थी आणि दोन आरोपी हे सर्व अल्पवयीन आहेत. आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर दुसऱ्याचा शोध सुरूय
एका विद्यार्थ्यानं गाडीवरून कट मारल्याचा राग मनात असल्यानं त्याची हत्या करण्यात आली, असं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे.
कॉलेजेसमधून आपण इंजिनिअर आणि डॉक्टर तर भरपूर घडवतोय, मात्र विवेकबुद्धीयुक्त नागरिक घडवण्यात आपली व्यवस्था आणि समाज कमी पडतायेत का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. आई-वडील देखील हल्ली मुलांना नकार कसा पचवायचा हे शिकवण्यात कमी पडतात का? मागितलं की द्यायचं, हट्ट केला की तो मानायचा, यात आई-वडिलांचंही चुकतं का?
जन्मापासून सर्व गोष्टी मनासारख्या झाल्यायत, असं जीवन जगणारी एकही व्यक्ती इतिहासात सापडणार नाही. नकार हा पचवावाच लागतो, तडजोड करावी लागते, प्रसंगी रागही गिळावा लागतो. याचा अर्थ आपला आत्मसन्मान गहाण ठेवायचा असं अजिबात नाही. पण कुठली गोष्ट किती ताणायची, आणि राग आला म्हणून कुठल्या थराला जायचं, याचा विचार आपण केला पाहिजे.
रागाच्या भरात एखाद्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी, अविचाराचा एक क्षण पुरेसा होतो. पण त्याचे परिणाम अनेकांना अगदी आयुष्यभर भोगावे लागतात. बारामतीतल्या त्या मृत विद्यार्थ्याच्या पालकांचाच विचार करा ना. त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा आता पुन्हा कधीच दिसणार नाहीय. त्यांनी कुणाच्या आधारानं जगायचं? का तर केवळ कुणा एकाच्या रागापायी...
झीरो अवरमध्ये तूर्तास आपण इथंच थांबूयात, उद्या संध्याकाळी सात वाजून ५६ मिनिटांनी पुन्हा भेटूयात नवीन विषयांसह. पण तुम्ही पाहात राहा एबीपी माझा.