KDMC : नवीन घर देतो म्हणून महिलेच घर तोडलं, नंतर घरच उपलब्ध नसल्याचं सांगितलं; कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रताप
KDMC : कारवाई करायची म्हणून एका दिवसात गरीब महिलेचं घर तोडलं. त्या आधी तिला नवीन घर देतो असं आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील 65 अनधिकृत इमारतीचा प्रश्न ऐरणीवर असताना या 65 इमारतीवर महापालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. मात्र गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम महापालिका करत असल्याचे समोर आले आहे. कल्याण पश्चिममधील सह्याद्री नगर परिसरातील माँ साहेब को ऑपरेटिव्ह सोसायटीमधील राहणाऱ्या पुष्पा आनंद अंकुश यांच्या घरावर महापालिकेने बुलडोझर फिरवला. तुमचे पुनर्वसन झाले आहे तुम्ही तिकडे राहायला जा असे त्यांना सांगितले. मात्र दिवसभर कार्यालयाबाहेर बसवून ठेवले आणि नंतर घर उपलब्ध नसल्याचे सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी घर तोडायला आले होते. त्यांनी घरातले सामान बाहेर काढेपर्यंतही धीर धरला नाही. एक दिवस थांबा, घरातील साहित्य बाहेर काढतो असं पुष्पा आनंद अंकुश यांनी विनवणी केली. पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं काहीही ऐकले नाही.
आम्हाला वरून असून तुम्ही आजच्या आज घर खाली करा. तुम्हाला साहित्य भरण्यासाठी आम्ही मदत करतो असं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंकुश यांना सांगितलं. तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेऊन सोडतो असं आश्वासन दिलं. मात्र एकदा घर पाडल्यानंतर त्यांनी कोणतीही मदत केली नाही असं त्या महिलेने सांगितलं.
पुष्पा आनंद अंकुश म्हणाल्या की, "मी रस्त्यावर येऊन बसलेली आहे. माझ्या अन्न पाण्याची कुठलीही सोय या ठिकाणी नाही. सकाळपासून अशीच बसलेली आहे. त्यांनी नोटीस लावली, त्यावेळी दहा वेळा महापालिकेमध्ये गेले. अनेक वेळा रमेश मिसाळ यांच्याकडे गेले. माझा 700 स्क्वेअर फुटाचा एरिया आहे, तो मला द्या एवढी माझी मागणी आहे. बाकी मला काही नको. मी त्या घरावरती पोट भरत आहे. मला इन्कम काहीच नाही. दुकान चालवून पाच पन्नास रुपये मिळत होते. मात्र आता घरच तोडलं आहे. आता मी कुठे राहू?"
या घटनेची माहिती एबीपी माझाला मिळतात त्या महिलेशी आणि महापालिका अधिकाऱ्यांची संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्या महिलेला मनपाच्या इमारतीमध्ये जाऊन, कुलूप तोडून राहा असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिल्याचं समोर आलं. ब प्रभाग क्षेत्राचे अधीक्षक भूषण कोकणे यांनी हा अजब सल्ला दिल्याची माहिती समोर आली.
एबीपी माझाच्या बातमीची दखल महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून त्या महिलेला लवकरच घर देऊन तिचं पुनर्वसन केलं जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा:























