Virat Kohli : बांगलादेशनं विराट कोहलीवर लावला 'फेक फिल्डिंग'चा आरोप, म्हणतात 'पेनल्टी दिली असती तर आम्ही जिंकलो असतो'
ICC T20 WC 2022, IND vs BAN : टी20 वर्ल्ड कपच्या 35 व्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला, पण सामन्यानंतर बांगलादेशच्या नुरुल हसनने विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग'चा आरोप लावला आहे.
IND vs BANG, Match Highlights : टी20 विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामना अगदी रोमहर्षक झाला. सामन्यात दोन्ही टीमच्या खेळाडूंनी अटीतटीचा खेळ दाखवला पण अखेर भारतानं 5 धावांनी सामना जिंकला आहे. पण सामन्यानंतर मात्र बांगलादेशच्या संघाकडून काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करण्यात आली तसंच सामनावीर विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग'चा आरोपही लावण्यात आला, तर नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊ....
सामन्यात भारतानं 5 धावांनी विजय मिळवला, यावेळी भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. सामन्यानंतर कर्णधार रोहितनं तर भारताच्या विजयाचं मुख्य कारण भारताची फिल्डिंग असल्याचं सांगितलं. पण याच फिल्डिंगदरम्यान विराट कोहलीनं फेक फिल्डिंग केल्याचा आरोप बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज नुरुल हसन (Nurul Hasan) याने' लावला आहे. 'कोहलीने एका थ्रोदरम्यान फेक फिल्डिंग केली होती आणि तेव्हा अम्पायरने नो बॉल दिला असता तर सामना आम्ही जिंकलो असतो' असं हसन म्हणाला.
काय आहे फेक फिल्डिंग?
बांगलादेशची बॅटिंग सुरु असताना 7 व्या ओव्हरमध्ये पाऊस पडायच्या आधी लिटन दास आणि शांतो फलंदाजी करत होते. तेव्हा सीमारेषेजवळ उभा असणाऱ्या अर्शदीपने एक थ्रो थेट किपरकडे केला. त्यावेळी मध्ये उभा असणाऱ्या विराटने बॉल त्याच्याकडे आहे असे दाखवत थ्रो करण्याची अॅक्शन केली. पण मूळात बॉल थेट किपरजवळ पोहोचला होता. याच थ्रोमुळे कोहलीने फेक फिल्डिंग केल्याचा आरोप नुरुलने लावला आहे.
पाहा VIDEO
so, even if this did happen, none of the batsmen from bangladesh appealed for this fake fielding 🤺#FakeFielding #NoBall #ViratKohli𓃵 #INDvsBAN #T20WorldCup #Cheating #SuryakumarYadav #KLRahul𓃵 #RohitSharma𓃵 #TeamIndia pic.twitter.com/Zl1qGNIto3
— mayank ranjan (@theranjanmayank) November 3, 2022
नियम काय म्हणतात?
क्रिकेट नियम 41.5.1 नुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कोणत्याही कृतीमुळे फलंदाजाच्या एकाग्रतेचा भंग होत असल्यास, पंच त्या चेंडूला डेड बॉल देऊ शकतो आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त 5 धावा देऊ शकतो.
शाकिबही होता नाराज
तर सामन्याचा विचार करता सर्वात आधी पावसानंतर पुन्हा सामना सुरु झाल्यावर मैदानत पूर्णपणे कोरडं नसतानाही सामना खेळवल्यामुळे कुठेतरी बांगलादेशचा कर्णधार शाकिब नाराज होता. त्याने ही नाराजी बोलून दाखवली नसली तरी सामना पुन्हा सुरु होण्यापूर्वी तो अम्पायरसोबत बातचीत करताना दिसून आला होता. तसंच कोहली बॅटिंग करत असतानाही एका ओव्हरमध्ये आलेल्या बाऊन्सवर कोहलीने नो बॉलची मागणी केली. जी अम्पायरने ऐकली देखील, ज्यानंतरही शाकिब आणि कोहलीमध्ये बातचीत झाली दोघेही अगदी खेळीमेळीच्या वातावरणात बोलत असले तरी शाकिब या निर्णयामुळे संपूर्ण सहमत नसल्याचं दिसून आलं.