Asia Cup : अटीतटीच्या लढतीत पाकिस्तान उपांत्य फेरीत पराभूत, अंतिम फेरीत भारत श्रीलंका आमने सामने
SL W vs PAK : महिला आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीलंकेनं पाकिस्तानला 3 विकेटनं पराभूत केलं आहे. अंतिम फेरीत त्यांचा सामना भारताविरुद्ध असेल.
कोलंबो : महिला आशिया कप (Womens Asia Cup 2024) स्पर्धेतील दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आज पार पडले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील लढत पहिल्यांदा झाली. भारतानं बांगलादेशवर 10 विकेटनं विजय मिळवत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान (SL W vs PAK W) यांच्यात उपांत्य फेरीची दुसरी लढत पार पडली. ही लढत रोमांचक झाली. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेनं तीन विकेटनं विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्ताननं अखेरच्या ओव्हरपर्यंत लढत दिली पण त्यांना यश आलं नाही. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 140 धावा केल्या होत्या. श्रीलंकेनं 19.5 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत ही 141 धावा करत विजय मिळवला. यामुळं आता 28 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम फेरीच्या लढतीत भारत आणि श्रीलंका आमने सामने असतील.
पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेटवर 140 धावा केल्या होत्या. उपांत्य फेरीचा सामना दाम्बुलामध्ये खेळवला गेला. पाकिस्तानकडून मुनिबा अली हिनं 37, गुल फिरोजा हिनं 25 धावा केल्या. कॅप्टन निदा दार हिनं 23 धावा केल्या. श्रीलंकेकडून ऊडेशिका प्रबोधिनी आणि कविषा दिलहारी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
श्रीलंकेनं चमारी अटापट्टू हिच्या 63 धावांच्या आणि अनुष्का संजिवनी हिच्या 24 आणि कविषा दिलहारीच्या 17 धावांच्या जोरावर 141 धावांचा टप्पा गाठला. पाकिस्तानकडून सादिया इक्बाल हिनं तिचा अनुभव पणाला लावला. तिनं श्रीलंकेच्या चार विकेट घेतल्या. ओमैयमा सोहैल हिनं एक आणि निदा दार हिनं एक विकेट घेतली. अखेरच्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला 3 धावांची गरज होती. निदा दार हिनं सुरुवातीला श्रीलंकेची एक विकेट घेतली. मात्र, ती 3 धावा वाचवू शकली नाही. यामुळं पाकिस्तानचं अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्वप्न भंगलं.
अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका आमने सामने
भारत आणि श्रीलंका महिला आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने सामने येतील. भारत आणि श्रीलंका यांच्यातील लढत 28 जुलै रोजी होणार आहे. भारतानं आतापर्यंत सातवेळा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाचा आठव्यांदा विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असेल. तर, महिला आशिया कप स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या श्रीलंकेचा घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवून इतिहास रचण्याचा प्रयत्न असेल.
भारताचा संघ : शफाली वर्मा, स्मृती मानधना, उमा छेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर
श्रीलंकेचा संघ : विश्मी गुणरत्ने, चमारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविचकर्म, कविषा दिल्हारी, निलाक्षी डीसिल्वा, अनुष्का संजीवनी, हंसिनी परेरा, सुगंदिक कुमारी, अछिनी कुलासुरिया, इनोषी प्रियदर्शनी, उदेषिका प्रबोधिनी
संबंधित बातम्या :