Sudarshan Ghule on Santosh Deshmukh : संतोष देशमुखांचं अपहरण कसं केलं? सुदर्शन घुलेचा कबुलीजबाब
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात आता न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपींचे जबाबही समोर येत आहेत. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख केल्यानंतर आता सुदर्शन घुलेचा सविस्तर जबाब एबीपी माझाच्या हाती लागला आहे. सुदर्शन घुलेने दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाची कहाणीच सांगितली. सरपंच देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी दोन गाड्या वापरण्यात आल्या होत्या, त्यापैकी स्विफ्ट कार अपहरण करण्यासाठी भाड्यानं आणली होती. बीड (Beed) अपहरण करतेवेळी येथील टोल नाक्यावर एक गाडी मागून आणि एक गाडी समोरून लावली होती. तर, संतोष देशमुख यांचे अपहरण करतात वायर, पाईप आणि लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. क्लच वायरने देखील त्यांना मारहाण केल्याची माहिती सुदर्शन घुलेने कबुली जबाबात दिलीआहे.
8 ऑक्टोबर 2024 रोजी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि आबादा कंपनीचे मॅनेजर थोपटे यांची बीडमधील जगमित्र कार्यालयामध्ये मीटिंग झाली होती. त्यावेळी दोन कोटी रुपये द्या, नाहीतर जिल्ह्यात कुठेही तुमचा प्लांट चालू देणार नाही, अशी धमकीच वाल्मिक कराडे दिली होती. विष्णू चाटेने खंडणीसाठी 29 नोव्हेंबर 2024 रोजी साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दोनवेळा फोन केले. त्यावेळी, वाल्मिक कराड यांच्यासोबत दुर्गा पूजेच्या काळात शिवाजी थोपटे यांच्याशी जे बोलणं झालं आहे, मीटिंगमध्ये ठरलं आहे, त्याप्रमाणे डिमांडबाबत विष्णू चाटेनं बोलणं केलं. परंतु शिंदे नावाचे मॅनेजर टाळाटाळ करत होते. त्यामुळे, तू लगेच प्लांटवर जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजून सांगा, असा आदेशच वाल्मिक कराडाने दिला होता. त्यानुसार सुदर्शन घुले एक वाजण्याच्या सुमारास आबादा कंपनीमध्ये गेला आणि त्याने तसा निरोप दिला.


















