Manoj Jarange Patil : बीडमध्ये भाषण सुरु असतानाच अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Manoj Jarange Patil : बीड (Beed) शहरातील एका मंगल कार्यालयात मराठा समाजातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील हजेरी लावली. मात्र, भाषण करत असतानाच अचानक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहेत.
बीडमधील मेळाव्याला मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून हजेरी लावली. या मेळाव्यात भाषण करत असताना मनोज जरांगे पाटील यांना अचानक चक्कर येऊ लागली. पण मनोज जरांगे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर जास्त चक्कर येत असल्याने त्यांनी मंचावर खाली बसून भाषण केले. हा मेळावा उरकून आयोजकांनी मनोज जरांगे यांना तातडीने बीडमधील रुग्णालयात दाखल केले आहे.
मनोज जरांगे पाटील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली
आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहेत. डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तपासण्या केल्या आहेत. रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी 24 तासांसाठी त्यांना बीडच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रकृती साथ देत नसल्याचे जरांगे पाटील यांनी भाषणात सांगितले होते.
मेळाव्याला धनंजय देशमुखांचीही उपस्थिती
दरम्यान, बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) देखील या कार्यक्रमात हजर होते. यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख भावूक झाले. संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगताना मनोज जरांगे पाटील, धनंजय देशमुख आणि उपस्थित महिला गहिवरल्याचे पाहायला मिळाले. मराठा समाजाने एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा एल्गार देखील मनोज जरांगे यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या























