Sharad Mohol Case: खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
Sharad Mohol Case: पुण्यात पुन्हा टोळी युद्ध, गॅंगवॉर डोकं वर काढण्याच्या प्रयत्नात? 5 जानेवारीला शरद मोहोळ हत्येला वर्ष पुर्ण, हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पोलिसांची कारवाई, वाचा सविस्तर
पुणे: पुण्यातील गुन्हेगारीवरती पोलिसांनी चाप बसवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र, अशातही अनेकदा गुन्हेगारी डोकं वरती काढताना दिसते. गेल्या वर्षी झालेल्या शरद मोहोळ (Sharad Mohol Case) हत्या फ्रकरणाचा बदला घेऊ पाहणाऱ्या दोन जणांना काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 5 जानेवारीला शरद मोहोळ (Sharad Mohol Case) याच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं, या हत्येचा बदला घेण्यासाठी 2 तरुणांचे प्लॅनिंग सुरू होते. तर इतकंच नाही आणखी दोघे याप्रकरणात फरार असल्याची माहिती आहे. पण नेमकं या आरोपींच्या टार्गेटवर कोण होतं? आणि पोलिसांनी त्यांचा प्लॅन कसा उधळला, सविस्तर पाहूया या रिपोर्ट मधून...
या घटनेला एक वर्ष झालं
पुण्यातील टोळी युद्ध तसंच गॅंगवर या शहराला काही नवीन नाही. अगदी याचं ताजं उदाहरण म्हणजे पाच जानेवारी 2024 रोजी शरद मोहोळ याला त्याच्याच गॅंगमधील एका तरुणाने भर दिवसा गोळ्या झाडून केलेली हत्या. शरद मोहोळ (Sharad Mohol Case) हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी 17 जणांना अटक केली असून हे सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात जेर बंद आहेत.
दुसऱ्या बाजूला या घटनेला एक वर्ष झालं आहे. याच हत्येचा बदला घेण्यासाठी आणि कोथरूड भागात वर्चस्व राहावं यासाठी काही जणांकडून प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या अनुषंगाने तपास करत असताना पोलिस शाखेच्या युनिट दोनने शरद मालपोटे आणि संदेश कडू या दोन तरुणांना पिस्तूलसह खराडी मधून अटक केली. याच प्रकरणी एका 19 वर्षीय तरुणाला हिंजवडी मधून देखील अटक करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये आणखी काही तरुण आहेत, मात्र ते अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
नेमकं त्यांचे "टार्गेट" कोण होते, हे समजू शकलेले नाही
याबाबत माहिती देताना अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितलं, शरद मोहोळ यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. नेमकं त्यांचे "टार्गेट" कोण होते, हे समजू शकलेले नाही. या संपूर्ण कटात आणखीही काही आरोपी आहेत. त्या दृष्टीने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. सध्या शरद मोहोळ हत्येसंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी गुंड विठ्ठल शेलारसह 17 जनांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
शरद मोहोळच्या हत्येला एक वर्ष जरी पूर्ण झालं असलं, तरी सुद्धा नेमका आरोपींचा प्लॅन बदला घेण्याचा होता का? कोथरूड आणि ग्रामीण भागात आपलं वर्चस्व टिकून राहावं, यासाठी त्यांनी याची आखणी केली होती का? याचा शोध देखील पोलिसांकडून सध्या सुरू आहे.