(Source: Poll of Polls)
Independace day 2022: देश स्वातंत्र झाला अन् माझा जन्म झाला; 15 ऑगस्ट 1947 रोजी जन्मलेल्या पुणेकराची गोष्ट
एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळत होतं आणि दुसरीकडे ते या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात पहिला श्वास घेत होते. गेले 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर अनेकांनी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्यांचा या सुवर्ण दिवशी जन्म झाला होता.
Independace day 2022: माझा जन्म 15 ऑगस्ट 1947 ला झाला आणि आज देशभर स्वातंत्र्यदिनासोबतच माझा वाढदिवसही साजरा होत आहे. याचा मला आनंद होत आहे. 75 वर्षात भारतात झालेले बदल मी जवळून पाहिले आहेत. बदलेला भारत, त्याचं वैविध्य आणि भारतातील लोकांची श्रीमंती अनुभवली आहे. त्यामुळे माझ्या जन्माबरोबरच भारताचा आणि भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो, असं 15 ऑगस्ट 1947 रोजी जन्म झालेले विनायक रोटीथोर एबीपी माझाशी बोलताना सांगत होते.
यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पुण्यासह देशभरातील प्रत्येक घरांवर डौलात तिरंगा फडकतो आहे. देशभरातील नागरीकांचा उत्साह पाहून विनायक रोटीथोर यांना स्वत:च्या जन्मतारखेचा अभिमान वाटत असल्याचं ते सांगतात.
विनायक रोटीथोर यांचा जन्म पुण्यात डहाणूकर कॉलनीत झाला. एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळत होतं आणि दुसरीकडे ते या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात पहिला श्वास घेत होते. गेले 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर अनेकांनी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्यांचा या सुवर्ण दिवशी जन्म झाला होता. त्याच्या कुटुंबात पाच जण होते. आई, वडिल आणि दोन बहिणींनंतर त्यांचा जन्म झाला. दोन मुलींनतर मुलगा झाल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. देश स्वातंत्र झाला आणि घरात मुलगा जन्माला आल्याने आनंद द्विगुणीत झाला होता, असं ते सांगतात.
विनायक रोटीथोर हे तीस वर्ष पुण्याच्या सेंट्रल बॅंकेत नोकरी करत होते. त्या काळात भारत कसा होता. याचं उत्तम उदाहरण सांगताना त्यांनी पुण्यातील वडलोपार्जित वाड्यांचा उल्लेख केला. नोकरी करत असताना त्यांनी पर्यटनाचा छंद होता. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत अनेक देशात प्रवास केला आहे. भारत कसा वेगळा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. युरोप, बॅंकॉक सारख्या देशात जाऊन त्यांनी अनेक थरारक प्रकार केले, असं सांगत त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
काही वर्षांपुर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यांना एक मुलगी आहे. मुलगी सध्या पुण्यात नोकरी करते. मात्र या सगळ्या वातावरणात त्यांना एकटेपणा जाणवला आणि त्यातून त्यांना अल्झायमर हा आजार झाला. या आजारावर उपचार करण्यासाठी सध्या ते पूना जेरियॅट्रीक केअर सेंटरमध्ये राहतात. विनायक हे फार बोलक्या स्वभावाचे नसल्याने त्यांना अनेकदा मानसिक त्रास होतो. मात्र ते पूना जेरियॅट्रीक केअर सेंटरमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतात, असं त्यांचे डॉ. संतोष कनशेट्टे यांनी सांगितलं.