चूक भूल करू नका, बापासोबत राहा; वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका: अजित पवार
चूक भूल करू नका, बापासोबत रहा...बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मुंबई : चूक भूल करू नका, बापासोबत राहा.... बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या कन्येला दिला आहे. वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, असे देखील अजित पवार म्हणाले.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहेरी येथील जनसन्मान यात्रेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचे काम सुरू आहे. मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मला त्यांना एकच सांगायचे आहे की, ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा...बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही, त्यासंदर्भात आम्ही देखील अनुभव घेतलेला आहे. मी त्यातून माझी चूक मान्य केली. मात्र आता माझे सांगणे आहे की, वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका.
लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार झाला : अजित पवार
विरोधक योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. योजना सुरू ठेवण्यासाठी आम्हाला आपलं सहकार्य हवं. आम्ही 3 योजना दिल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मोफत सिलिंडर आणि गरीब मुलींना 11 वीनंतर मोफत शिक्षण तसेच पावसामुळे मोठं नुकसान झालं 1 रुपयात सरकार विमा देत आहे.आदिवासी योजनांसाठी 15 हजार 360 कोटी अर्थसंकल्पात आपण तरतूद केली आहे. काही जण सांगतात संविधान बदलणार... मागे लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार झाला . जगातला सर्वात एक नंबर संविधान आहे, असे अजित पवार म्हणाले.
जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार, धर्मरावबाबांचा शरद पवारांना सवाल
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर नाव न घेता टीका केली. पक्षफोडी करणारा पक्षच आता माझं घर फोडण्याचं काम करतोय असं आत्राम यांनी म्हटलंय. धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहे, त्यावरून ते टीका करत होते. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार असा सवाल त्यांनी केलाय.
हे ही वाचा :