(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Nashik Crime News: बाइकवरून आलेल्या तीन ते चार जणांनी या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हजार खोली भागातील मदिना चौकामध्ये ही घटना घडली आहे.
नाशिक: मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक नगरसेवक आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला (Malegaon Corporator Attack) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री मालेगावच्या हजार खोली परिसरातील मदिना चौकात ही घटना घडली. यावेळी हल्लेखोरांनी माजी नगरसेवक अझीझ लल्लू (Aziz Lallu) व त्यांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मदिना चौकात मोटारसायकलवरुन आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर धारदार शस्त्रांनी वार केले. हा हल्ला जमिनीच्या वादातूनच झाल्याचे सांगितले जाते. अझीझ लल्लू यांचे त्यांच्या नातेवाईकांशी जमिनीवरुन वाद सुरु होते. त्यांच्याकडूनच हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. गेल्या आठवड्यातच मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेने मालेगाव हादरले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मालेगावमध्ये पोलिसांची भीती उरली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे मालेगावामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चेहऱ्यावर वार, हाताची बोटंही कापली
अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा मशिदीतून नमाज पाठणानंतर बाहेर पडले. त्यानंतर मदिना चौकात हल्लेखोरांनी अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर धारदार शस्त्रांनी एकापाठोपाठ वार केले. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हाताची बोटेही कापण्यात आली आहेत. तर त्यांच्या मुलाच्या पाठीवर वार करण्यात आले आहेत. या दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
...तर मालेगावसारखी परिस्थिती सर्वत्र दिसेल: इम्तियाज जलील
मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर हल्ला झाल्यावर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी हा हल्ला राजकीय वादातून झाल्याचा आरोप केला होता. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर सर्वत्र अशीच परिस्थिती दिसेल. बंदुकीचा धाक दाखवून अनेकांना शांत बसवण्याचा प्रयत्न होईल, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.
आणखी वाचा