Nashik Factory Fire : नाशिकच्या वडाळागावात गादी कारखान्याला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली!
Nashik Factory Fire : नाशिक शहरात मार्च-एप्रिलच्या (Nashik City) दरम्यान दुकान, हॉटेल्स आणि गोदामांना आगी लागण्याचे प्रकार हे दरवर्षी घडत असतात.
Nashik Factory Fire : नाशिक शहरात मार्च-एप्रिलच्या (Nashik City) दरम्यान दुकान, हॉटेल्स आणि गोदामांना आगी लागण्याचे प्रकार हे दरवर्षी घडत असतात. शहरातील अंबड (Ambad), वडाळा गाव, सिडको आदी परिसरात दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने या आगीच्या (Fire) घटना घडत असतात. अशातच सोमवारी (10 एप्रिल) वडाळा गावातील खोडे नगर रस्त्यालगत असलेल्या गादीच्या कारखान्याला भीषण आग (Major Fire) लागल्याची घटना घडली.
नाशिक शहरातील (Nashik) वडाळा गावात असलेल्या वसीम मंसुरी यांच्या मालकीच्या गादी कारखान्यात पत्र्याच्या शेडचे वेल्डिंगचे काम चालू होते. अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. या गादी कारखान्यात कापूस असल्याने आगीचा काही क्षणात भडका उडाला. घटनेची माहिती अग्निशामन दलाला मिळून अग्निशमन दलाचे पटकन घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे आकाशात आगीचे लोट वडाळागाव चौफुलीपासून दिसत होते. त्यामुळे गादी कारखान्यात असलेल्या कापसासह गादी तयार करण्याचे साहित्य जळून खाक झाले आहे.
दीड तासांनी आगीवर नियंत्रण
सोमवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास ही भीषण आगीची घटना घडली. याआधीच सुमारे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तब्बल दोन ते अडीच तास धगधगणारी ही आग अग्निशामन दलाच्या जवानांना दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात यश आलं. यासाठी शहरातील विविध भागातून सुमारे आठ अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान कारखान्याच्या मागील बाजूला चाळ असून आठ ते दहा घरांमध्ये काही नागरिक राहत होते. आगीचा भडका उडताच त्या घरातील नागरिकांना पोलिसांनी तात्काळ घराच्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.
दरवर्षी आगीच्या घटना...
दरम्यान गादी कारखान्याला लागलेल्या आगीमुळे घटनास्थळी दोन ते तीन भीषण स्फोट झाले. हे स्फोट सिलेंडरचे असल्याची चर्चा पसरल्याने परिसरात भीतीच्या वातावरण निर्माण झाले होते. गादी कारखान्याच्या पाठीमागे अरुंद रस्ता असल्याने अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीजवळ जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. मागील काही वर्षांमध्ये वडाळा गावात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या भागातील भंगार गोदामांनाही वर्षांतून अनेकदा आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे वडाळा गाव आणि आगीचे सूत्रच बनत असले तरी आपत्ती निवारण विभागाकडून अशा दुर्घटनांना आमंत्रण देणाऱ्या गोदामांवर आणि अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.