Nashik Fire : नाशिकच्या म्हसरुळ वनपरिक्षेत्रात आगीचा भडका, वनराई खाक, दोन मोर वाचवले!
Nashik Fire : नाशिक पश्चिम वन विभागाच्या म्हसरूळ परिसरातील वनराईत आग लागल्याची घटना घडली.
Nashik Fire : नाशिक (Nashik) पश्चिम वन विभागाच्या म्हसरुळ परिसरात वनराईत आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत मागील अनेक वर्षांपासून विकसित केलेल्या वनराईला चांगलीच झळ बसली. शिवाय वनराईत बागडणाऱ्या मोरांच्या (Peacock) पिल्लांना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र आगीत बहुतांश वनसंपदा जळून खाक झाली आहे.
नाशिक वनपरिक्षेत्रातील म्हसरुळ शिवारात वनविभागाकडून (Nashik forest) मोठ्या प्रमाणावर वनराई फुलवण्यात आली आहे. या ठिकाणी वन विभागाने अवैध लाकूड तस्करीमध्ये जप्त केलेल्या वाहनांसह खैरसागाचा साठाही ठेवण्यात आलेला आहे. याच ठिकाणी जंगलात रोपवन मागील सहा वर्षांपासून आपले पर्यावरण संस्था आणि वनविभागाने संयुक्तरित्या विकसित केले आहे. हजारो रोपांची दमदार वाढ झाल्याने त्यांचे झाडांमध्ये रूपांतर झाले होते. मागील वर्षी या ठिकाणी झुडपांची लागवड करण्यात आली होती. याच ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकाम देखील सुरु आहे. मात्र याच ठिकाणी दुपारच्या सुमारास आग लागून प्रचंड नुकसान झाले आहे.
अज्ञात व्यक्तीमुळे वणवा भडकल्याचा अंदाज
दरम्यान दुपारपासून भडकलेल्या आगीमुळे या वनामधील वन्यजीवांसह वन्य पक्षीदेखील सैरभैर झाल्याचे दिसून आले. यावेळी आगीची झळ मोरांच्या तीन ते चार महिन्यांच्या पिलांना बसली. वेळीच ही बाब वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तात्काळ प्रथमोपचार देत मोरांचे प्राण वाचवण्यात यश आले. आग धुमसत असल्याने वनाधिकाऱ्यांनी अग्निशामन दलाला प्राचारण केले. परिसरात असलेल्या एखाद्या अज्ञात व्यक्तीमुळे हा वणवा भडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला ठिणगी उडाली, मात्र नंतर वनराई रोपवनामध्येही आगीने धुमाकूळ घातला. त्यामुळे वनराईमध्ये असलेल्या झाडांना देखील या आगीची झळ बसली. त्याचबरोबर वनराईत असलेल्या गवतामुळे देखील आग आटोक्यात आणण्यात अपयश येत होते. त्यामुळे रोपवनाचेही मोठे नुकसान झाल्याचे वन विभागाने सांगितले.
आग विझवताना वनअधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक
दरम्यान वन कर्मचारी वनमजूरांसह आजूबाजूचे युवक असे सुमारे 15 ते 20 लोकांनी आग विझवण्यासाठी मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनाही शक्य होईल होईल तिथपर्यंत पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. आगीच्या घटनेत मोठे वनक्षेत्र बाधित झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना वनाधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांनी त्वरित अग्निशामन दलाला माहिती देत मदत मागितली. पंचवटी उपकेंद्राच्या बंबासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली सायंकाळी उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.