Nashik Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात, डिव्हायडर तोडून बस दुचाकीला धडकली!
Nashik News : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेलगाव ढगा परिसरात भीषण अपघात झाला आहे.

Nashik Accident : नाशिक (Nashik) शहर परिसरात पुन्हा एक भीषण अपघात (Major Accident) झाला असून खासगी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. देवदर्शनाहून परतताना हा भीषण अपघात घडला आहे. तर या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेलगाव ढगा (Belgaon Dhaga) परिसरात ही घटना घडली आहे.
देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला
दरम्यान, खासगी वाहतूक करणारी बस प्रवाशांनी भरलेली होती. त्र्यंबकेश्वरहुन देवदर्शन करून निघाल्यानंतर नाशिककडे मार्गक्रमण करीत होती. अशातच बेलगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुल जवळ आली असता टायर फुटले. बस थेट डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये आली. यामुळे नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक देत झाडावर आदळली. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दुचाकीवरील जखमींना तातडीने जवळच्या दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याआधीही भीषण अपघात
दोन दिवसांपूर्वीच वणी सापुतारा मार्गावर (Vani Saputara Accident) भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना प्राण गमवावे लागले. यात एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा देखील समावेश होता. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तर आज सकाळी नाशिक-त्र्यंबकेश्वर या मार्गावर बस दुचाकींचा अपघात झाला. ही बस त्र्यंबकेश्वर हुन नाशिककडे येत होती. बेलगाव ढगा फाट्याजवळ आली असताना अचानक बसचा टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रणही सुटले. त्यामुळे दोन दुचाकीस्वारांना बसनं उडवलं. या अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
दोन दिवसांत तीन भीषण अपघात
मुंबई-आग्रा महामार्ग (Mumbai Agra Highway) मृत्यूचा सापळा बनला आहे. इगतपुरीतील (Igtapuri) पंढरपुरवाडी समोर नाशिकहून (Nashik) मुंबईकडे (Mumbai) जाणारी अॅसेंट कार ही गाडी भरधाव वेगाने जात होती. परंतु, त्याचवेळी गाडीचा पुढील टायर फुटल्याने ही कार उडून थेट मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळली. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण दगावले असून यात एका लहान मुलीचा समावेश आहे.
दुसरी घटना वणी सापुतारा मार्गावर घडली आहे. नाशिकहून गुजरातला जोडणाऱ्या वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. वणी सापुतारा रस्त्यावर एसटी बसने दोन दुचाकीला चिरडले आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मार्गावर सुरगाणा-नाशिक बस धावत असताना खोरी फाट्याजवळ दोन दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील प्रवाशांना बसने चिरडले. या अपघातात आठ महिन्याच्या चिमुरड्यासह वडील व आई असे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
