Nashik:वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात, एसटीन कुटुंबातील आठ महिन्यांच्या चिमुकलीसह तिघांना चिरडलं!
Nashik Bus Accident: नाशिक जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच असून इगतपुरी जवळील पंढरपूरवाडी कुटुंबातील चार जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात झाला आहे.
Nashik Bus Accident: नाशिक जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच असून इगतपुरी जवळील पंढरपूरवाडी कुटुंबातील चार जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत असून नाशिक जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण प्रचंड आहे. दररोज एक ना एक मोठी अपघाताची घटना समोर येत आहे. नाशिकहून गुजरातला जोडणाऱ्या वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. वणी सापुतारा रस्त्यावर एसटी बसने दोन दुचाकीला चिरडले आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मार्गावर सुरगाणा-नाशिक बस धावत असताना खोरी फाट्याजवळ दोन दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील प्रवाशांना बसने चिरडले. या अपघातात आठ महिन्याच्या चिमुरड्यासह वडील व आई असे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा - नाशिक ही एसटी बस वणी सापुतारा मार्गावरून येत होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास खोरीफाटा परीसरात एसटी बसने दोन दुचाकीना धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की बसच्या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला. यात एका दुचाकीवरील आठ महिन्याच्या बालकासह आई वडील हे जागीच ठार झाले आहेत. यात निफाड तालुक्यातील सारोळे येथील विशाल नंदु शेवरे, अम्रुता विशाल शेवरे, सायली विशाल शेवरे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अपघातानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रस्त्याच्या कडेला दुचाकीला धडक देऊन...
तर अपघाता दरम्यान खोरीफाटा परीसरात एक दुचाकी रस्त्यालगत उभी होती. त्यावरील लोक झाडाखाली बसलेले असताना या दुचाकीला, धडक देत समोरुन येणाऱ्या आणखी एका दुचाकीला धडकत दिली. यावेळी सुमारे तीस ते पस्तीस मिटर अंतरापर्यत या दुचाकीला फरफटत नेले. या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला
अपघातानंतर नागरिकांमध्ये हळहळ
दरम्यान, अपघात झाल्यानंतर दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला प्राण गमवावा लागला. यावेळी रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावून झाडाखाली बसलेले आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एकाच कुटुंबातील तिघेही आई वडील मुलगी निधन झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती. एसटी बसमधील देखील काही प्रवासी जखमी झाल्याची माहीती मिळाली आहे. अपघातानंतर वणी सापुतारा महामार्गावरील वाहतुक काही काळ खोळंबली होती. पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुस लावल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. तर या भीषण अपघातात निधन झालेले कुटुंब हे निफाड तालुक्यातील सारोळा असल्याची माहीती आहे.