एक्स्प्लोर
संकटकाळी लोकलच्या महिला डब्यातून थेट गार्डशी संपर्क
मुंबई : मुंबईच्या लोकल रेल्वेतील प्रवास महिलांसाठी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनातर्फे दिवसेंदिवस प्रयत्न केले जात आहेत. पॅनिक बटण तितकंसं प्रभावी ठरत नसल्याचं समोर आल्यानंतर ते हटवण्याचा विचार सुरु झाला. त्यानंतर महिला प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत थेट लोकलच्या गार्डशी संपर्क साधण्याची सुविधा पश्चिम रेल्वे पुरवणार आहे.
लोकलमधील महिलांसाठी आरक्षित डब्यात वॉकी-टॉकी सदृश्य सुविधा असलेल्या 'परे'च्या दोन लोकल लवकरच सेवेत येणार आहेत. गार्डशी संपर्क करण्याच्या या सुविधेसाठी साधारण 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
महिलांच्या डब्यात दरवाजाजवळ मायक्रोफोन बसवण्यात येणार आहे. त्यावरील बटण दाबताच तात्काळ गार्डशी संवाद साधता येईल. या यंत्रणेतून महिला प्रवासी आणि गार्डना वॉकी-टॉकीप्रमाणे थेट बोलता येईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर इतर लोकलमध्येही तिचा समावेश केला जाणार आहे.
या यंत्रणेद्वारे गार्डला महिलांच्या डब्यातील परिस्थितीची माहिती मिळताच पुढील कारवाईसाठी वेळ मिळेल. लोकल पुढील स्टेशनवर थांबवावी की तात्काळ याची सूचना मोटरमनला देणंही गार्डला शक्य होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेचा दुरुपयोग करण्याच्या वृत्तीवर नियंत्रण येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महिलांकडून गैरवापरामुळे पॅनिक बटण काढण्याची तयारी?
मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवासाठी रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर ‘पॅनिक बटण’ सुरु केलं. मात्र गेल्या आठवड्यात दोन वेळा त्याचा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका रेल्वेने घेतली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या एका लोकलमध्ये महिलांच्या पाच डब्यांत पॅनिक बटण बसवण्यात आलं आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य लोकलमध्ये ही सुविधा देण्याचा रेल्वेचा मानस आहे. महिलांना रेल्वे डब्यात जर असुरक्षित वाटत असल्यास किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या हे बटण दाबून तात्काळ मदत मिळवू शकतात. मध्य रेल्वेवर गेल्याच आठवड्यात सलग दोन दिवस वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांमध्ये लोकल आली असता महिलांच्या डब्यातून या पॅनिक बटणाचा वापर करण्यात आला. मात्र महिला प्रवाशांना कोणताही धोका नसताना त्याचा गैरवापर झाल्याचे समोर आले.महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पॅनिक बटण
या बटणचा वापर झाल्याने दोन्ही दिवस लोकल सुमारे 15 मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. मात्र या घटनांची चौकशी केली असता त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. अशावेळी एखादी लोकल 15 मिनिटे एकाच ठिकाणी कोणत्याही ठोस कारणाशिवाय उभी राहिल्यास संपूर्ण वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. ऐन गर्दीची वेळ असल्यास प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. या परिस्थितीत पॅनिक बटणचा गैरवापर होण्याचे प्रकार वारंवार झाल्यास या योजनेचा पुनर्विचार करावा लागेल, असे मत रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement