Taxi Strike : मुंबईत टॅक्सीचालकांचा संपाचा इशारा, CNG महागल्याने भाडेदरात वाढ करण्याची मागणी
सीएनजीचे दर वाढल्याने टॅक्सी भाडेदरातही वाढ करावी अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. ही मागमी मान्य न केल्यास संपाचा इशारा दिला आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत टॅक्सीचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सीएनजीच्या किमतीत गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड टॅक्सी चालकांना सोसावा लागतोय. ही वाढ चालकांनाही परवडणारी नसल्याने टॅक्सीच्या प्रवासी भाडे दरात किमान पाच रुपये वाढ करावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिला आहे. मुंबईत साधारण 35 हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी या सीएनजीवरच धावतात.
मुंबईत सध्या टॅक्सींचे किमान भाडे 25 रुपये इतके असून ते किमान 30 रुपये करावं अशी मागणी करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीने सीएनजीच्या किमतीत प्रति किलो तीन रुपये सहा पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे आता सीएनजीचा दर प्रति किलोमागे 61 रुपये 50 पैसे इतका झाला आहे. ही दरवाढ 26 नोव्हेंबरपासून लागू झाली आहे.
सीएनजीच्या या दरवाढीचा भुर्दंड हा टॅक्सी चालकांना सोसावा लागत आहे असं युनियनचं मत आहे. यामुळे टॅक्सी चालकांचा उत्पन्न आणि खर्च याचा मेळ बसत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने टॅक्सीच्या किमान भाडेदरात वाढ करण्याचा विचार करावा अशी मागणी टॅक्सी युनियनने केली.
राज्य सरकारने ही भाडेवाढीची मागणी मान्य करावी अन्यथा टॅक्सीचालक संपावर जातील असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे.
मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ
महानगर गॅसने (Mahanagar gas) मुंबईत सीएनजी प्रतिकिलो 3 रुपये 6 पैशांनी तर पीएनजी 2 रुपये 6 पैशांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरानुसार मुंबईत एक किलो सीएनजीसाठी 61 रुपये 50 पैसे तर एक किलो पीएनजीसाठी 36 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. दररोजच्या भाववाढीमुळे देशातील महागाईचा उच्चांक दिसून येत आहे. सर्वच वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या :
- महागाईची झळ, सहा आठवड्यात CNG-PNG तिसऱ्यांदा महागलं
- रिक्षा भाडेवाढीनंतर पुणेकरांना दुसरा झटका, सीएनजी दरात 1 रुपया 80 पैशांची वाढ
- Price Rise : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार