Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Anjali Damania : एसआयटीमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या समावेशावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कडाडून हल्लाबोल केला आहे.
Anjali Damania : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. एका निष्पाप सरपंचाची अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर बीडमधील दंडेलशाही समोर आली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडणीखोर वाल्मिक कराडवर गंभीर आरोप होत असून तोच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील अनेक नेत्यांनी केला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड अत्यंत निकवर्तीय असल्याने मुंडे यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
एसआयटीमध्ये बीड पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या समावेश
या सर्व पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. मात्र, एसआयटीमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या समावेशावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कडाडून हल्लाबोल केला आहे. सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये बीड पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. त्यामुळे बीडमधील अधिकारी आता बीडच्या बाॅसची चौकशी करणार का? असा सवाल दमानिया यांनी केला आहे.
SIT निष्पक्ष चौकशी करणार ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 5, 2025
संतोष देहमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने ?
ह्या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का ?
बीड चे अधिकारी बीड च्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार ?
आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकरवर्ती आहेत असे माध्यमांमधून कळते pic.twitter.com/8PTAq1Y1Nx
त्यांनी ट्विट करत वाल्मीक कराडसोबतचा एका पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच शेअर करत हल्लाबोल केला आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, SIT निष्पक्ष चौकशी करणार? संतोष देहमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? बीडचे अधिकारी बीड च्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार? आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकरवर्ती आहेत असे माध्यमांमधून कळते.
डॉ. बसवराज तेली यांच्या नेतृत्वात संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन
दुसरीकडे,सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या नेतृत्वात संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या पथकात 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी केज पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. तेली यांना स्वतःच्या पसंतीचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांचा पथकात समावेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार चार दिवसांपूर्वी शासन आदेश जारी करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या