Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली आहे. दोघांच्या भेटीची वेळ मागितली असून मी पत्रकार परिषदेत सविस्तर बोलेन, असे त्यांनी सांगितले.
Anjali Damania : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील दंडेलशाहीविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. संतोष देशमुख हत्येनंतर अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात आज (5 जानेवारी) पत्रकार परिषद घेणार असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
दमानिया यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, मी आज दुपारी 12 वाजता माझ्या निवासस्थानावरून पत्रकार परिषद घेणार आहे. प्रचंड प्रमाणात मानसिक छळ केल्याचा आरोप करत दमानिया यांनी ते कोण आहेत त्याचा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे. माझा प्रचंड छळ केला जात असून या संदर्भात वरिष्ठांना भेटणार असल्याचेही सांगितले. असा महाराष्ट्र आहे का? अशी विचारणाही दमानिया यांनी केली. दरम्यान, आपण पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली आहे. दोघांच्या भेटीची वेळ मागितली असून मी पत्रकार परिषदेत सविस्तर बोलेन, असे त्यांनी सांगितले.
समाजाच्या नावाखाली दुकान चालवत आहेत
दरम्यान, अंजली दमानिया यांनी आपण केलेल्या वक्तव्यावरून गैरसमज पसरवत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी जे विधान केलं त्याबद्दल मोठ्या प्रमाणात जाणून बुजून वंजारी समाजात गैरसमज पसरवण्याचे काम हे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड समर्थक करत आहेत. वंजारी समाजातील लोकांबद्दल व त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मी मुळीच बोलत नाही, तसे बोलण्याचे काहीच कारण नाही. मला पूर्ण कल्पना आहे की हा समाज अतिशय भोळा, कष्टाळू आणि मेहेनतू आहे. गोपीनाथ मुंडे यांनी या समजला मदतीचा हात दिला त्यात देखील काही चुकीचे नाही. चुकीचे आहे त्यांचा राजकीय वापर कारणे जे धनंजय आणि पंकजा मुंडे सरास करत आहेत. आपल्या मर्जीतील लोक परळी मधे ठेऊन ते समाजाच्या नावाखाली दुकान चालवत आहेत. माझा ह्याच गोष्टीवर अक्षेप आहे. युवापीढीला संत भगवान बाबांसारखं मार्गदर्शन करायचे सोडून, ही मंडळी दहशतीसाठी वापर करत आहे त्याचे वाईट वाटते. समंजस व बुद्धिमान वंजारी समाजाने हे समजून घ्यावे ही विनंती.
इतर महत्वाच्या बातम्या