लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
अनिता सुभाष देशमुख हिची महसूल सहायकपदी निवड झाली असून 2023 मध्ये तिने एमपीएससी मार्फत महसूल सहायकपदासाठी एमपीएससीमार्फत परीक्षा दिली होती.

नांदेड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गत दोन वर्षांपूर्वी झालेल्या परीक्षेत महसूल सहायक (MPSC) पदावर लेकीनं बाजी मारल्याने आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना झाला. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लेक आपल्यापासून कोसो दूर राहिली, पुण्यात राहून अभ्यास केला आणि अखेर यशला गवसणी घातली. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झालं, लेकीनं पांग फेडलं अशीच काहीशी भावना शेजारी-पाजारी यांच्यासह सर्वांची होती. अनिता देशमुख ही शेतकरी कन्या आता महसूल विभागात अधिकारी बनली आहे. नांदेड जिल्ह्यातील मूदखेड तालुक्यातच आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे गाठलं होतं. अखेर तिची मेहनत आणि आई-वडिलांचे कष्ट फळाला आले. लेकीनं यश मिळवत नाव काढले. म्हणूनच शेतकरी (Farmer) बापाने लाडक्या लेकीची वाजत गाजत मिरवणूक काढली.
अनिता सुभाष देशमुख हिची महसूल सहायकपदी निवड झाली असून 2023 मध्ये तिने एमपीएससी मार्फत महसूल सहायकपदासाठी एमपीएससीमार्फत परीक्षा दिली होती. त्यामुळेच, आज महसूल सहायकपदी निवड झालेल्या लेकीची आई वडिलांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. अनिता देशमुख ही मूळ मुदखेड तालुक्यातील चिकाळा येथील रहिवासी असून सद्या ती आपल्या आई-वडिलांसोबत सांगवी भागातील गोपाळनगर येथे राहते. तिचे वडील सुभाष देशमुख हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. अनिताने पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या महसूल सहायक पदाच्या परीक्षेच्या निकालात अनिताचे नाव झळकले असून तिने यश मिळवले.
निकालानंतर पहिल्यांदाच अनिताचे आज नांदेडमध्ये आगमन झाले. त्यावेळी आई वडिलांनी सांगवी ते गोपालनगर येथील निवास्थानापर्यंत ढोल-ताशाच्या गजरात तिची मिरवणूक काढली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करावे यश नक्की मिळेल, असा संदेश अनिता देशमुख हिने यावेळी दिला. दरम्यान, अनिताचा नातेवाईकांसह मान्यवरांकडून सत्कार केला जात असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा
धनंजय मुंडे सलग तिसऱ्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर; पण 564 कोटींसाठी ट्विट, मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

