(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Katta : आवली कशी सापडली? नाटकाची निर्मिती कशी झाली? 'संगीत देवबाभळी' टीमचा माझा कट्ट्यावर संवाद
मराठी नाट्यभूमीवरील काही संस्मरणीय नाटकांपैकी एक असलेल्या संगीत देवबाभळी या नाटकाची टीम आज माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये आली होती.
Majha Katta : तुकोबारायांना न्याहरी नेत असताना आवलीला काटा लागतो आणि मग तो काटा विठ्ठल काढतो, या संकल्पनेवर आधारित असलेल्या संगीत देवबाभळी या नाटकाने मोठं यश प्राप्त केलं आहे. आपल्या 400 व्या प्रयोगाच्या उंबरठ्यावर असलेल्या या नाटकाला आतापर्यंत 44 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या नाटकाची निर्मिती कशी झाली? नाटकातील आवली कशी सापडली? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आज संगीत देवबाभळी या नाटकाच्या टीमने दिली. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर 'संगीत देवबाभळ' टीमने दिलखुलास गप्पा मारल्या.
आवली कशी सापडली?
या नाटकात तुकोबारायांची पत्नी, आवलीच्या भूमिकेत शुभांगी सदावर्ते दिसते. हे तिचे पहिलेच नाटक आहे. त्या आधी शुभांगीने त्याच्या अफू या नाटकात दोन ओव्यांसाठी एन्ट्री केली होती. शुभांगी सदावर्ते म्हणते की, ते काम पाहून प्राजक्त देशमुखने मला संगीत देवभाबळीसाठी विचारणा केली. यासाठी सुरुवातीला मला वेगवेगळ्या पद्धतीने गायला सांगितलं. त्यानंतर हळूहळू मला आवलीचं कॅरेक्टर मिळत गेलं. पण पहिल्या प्रयोगाला जी भीती वाटत होती तिच भीती आजही वाटते.
रखुमाई कशी सापडली?
या नाटकासाठी रखुमाईची भूमिका कशी मिळाली असा प्रश्न विचारला असता मानसी जोशी म्हणते, मी आधी डबिंगवर फोकस केला होता. त्यानंतर या नाटकासाठी मला विचारणा करण्यात आली. खूप वेळानंतर मला मराठी नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकाच्या तयारीसाठी दहा ते पंधरा दिवसांचा वेळ मिळाला होता. त्यादरम्यान स्क्रिप्ट वाचली आणि आपण काहीतरी भन्नाट करतोय असा भास झाला. त्यानंतर या नाटकावर काम केलं, भाषेवर काम केलं. संगीत नाटक असल्यानं बोली भाषेतून गाणं गाण्याचा प्रयत्ने केला.
नाटक कसं सुचलं?
या नाटकाची संकल्पना कशी सूचली असा प्रश्न विचारला असता या नाटकाचा दिग्दर्शक प्राजक्त देशमुख म्हणाला की, माझ्या घरची परंपरा वारकरी संप्रदायातील आहे. वारीसाठी आजोबा घरी यायचे त्यावेळीपासून त्यांचं निरीक्षण करायचो. मी पहिल्यांदा पंढरपूरला गेल्यांतर, मूर्ती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी एकच मूर्ती असल्याचं पाहिलं आणि दुसरी मूर्ती कुठेय असं आईला विचारलं. रखुमाई रुसली आणि मागे जाऊन बसली असं आईने त्यावेळी मला सांगितलं होतं. या आणि अशा अनेक गोष्टींचं निमित्त झालं आणि या नाटकाची निर्मिती झाली. तुकोबांनी ओव्या लिहिल्या आहेत आणि ती पानं वाऱ्याने उडून अस्ताव्यस्त होतात, ती पानं आवली वेचतेय असा भास मला झाला. भारतीय स्त्री स्वतःकडे कसं बघते याचा अनुभव या नाटकातून मिळतोय.
प्राजक्त देशमुख म्हणाला की, मी सुरुवातीला संगीत अफू नावाचं नाटक केलं. एकदा मी भंडारा डोंगरावर गेलो असता त्या ठिकाणी मला एक चौकोन दिसला. त्यामध्ये रुसलेली रखुमाई आणि विठ्ठलाचं भांडण तुकोबा आणि आवलीचं भांडण, आवलीच्या पायातील काटा विठ्ठल काढताना त्या ठिकाणी रखुमाई येते, त्यानंतर रखुमाई आणि आवलीचं भांडण सुरु असल्याचा भास झाला. तुकोबा आणि विठ्ठलाचं भांडण हे एक वेगळंच होतं. या चारही भांडणांना मी एका चौकोनात आणलं आणि या नाटकाची निर्मिती झाली.
या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी म्हणाले की, प्राजक्तने या नाटकाची संकल्पना मांडली. गद्य भाषेत असलं तरी सर्वसामान्यांच्या भाषेत असल्यानं त्यामुळे हे करायचंच असं फिक्स केलं. सुरुवातीच्या 70-80 प्रयोगाला खूप कमी प्रेक्षक संख्या लाभली. पण प्रयोग थांबवले नाहीत. त्यानंतर मात्र चांगला प्रतिसाद मिळत गेला. भद्रकालीच्या यशामध्ये हे नाटक माईल स्टोन ठरलं आहे.
नाटकाची दिंडी
अधिक बोलताना संगीतबाभळी नाटकाची दिंडी काढण्यात येणार आहे अशी माहिती या टीमच्या वतीनं देण्यात आली. हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही दिंडी आहे. भारतभर जिथे कुठे मराठी माणूस त्या ठिकाणी पोहोचवण्याची ही संकल्पना आहे. या दिंडीची सुरुवात 9 मार्च रोजी, म्हणजे तुकाराम बीजदिवशी होईल आणि 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीदिवशी किंवा त्या आधी किंवा नंतर याची समाप्ती करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा :