(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपेना... 24 मार्चनंतर पुन्हा अवकाळीचा इशारा
Unseasonal Rain : सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा अन् उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे.
Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मार्चपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ जाली आहे. सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा अन् उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे. यातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. उभी पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकारकडून मदतीची घोषणा झाली पण अनेक ठिकाणी बांधावर अधिकारी पोहचले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अधीच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखी संकटात जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी संपतच नाही.
आज सकाळपासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्यात आज सर्वत्र हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. सहसा दुपारी किंवा त्यानंतर हलक्या सरी दिसू शकतील, असे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रांचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्राकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस कोसळत आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते ज्यामुळे मुंबई आणि उपनगरात आज पाऊस झाला. सहसा सकाळी वाऱ्यांची दिशा ही पूर्वेकडून असते मात्र आज वाऱ्यांची दिशा पश्चिमी होती आणि त्यामुळे पाऊस बघायला मिळाला. पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील तापमानात दोन ते तीन अंशांची घट बघायला मिळेल, असेही कांबळे यांनी सांगितले.
24 मार्चनंतर महाराष्ट्रात पुन्हा काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या महिन्यात दोन वेळा आलेल्या अवकाळीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. त्यातच पुन्हा अवकाळीचा इशारा दिल्याने शेतकऱ्याने जगायचं कसं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या राज्यात रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरू आहेत. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी सर्दी, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या हवामानामुळे आजारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे.
आणखी वाचा :