लुटमार करू पाहणाऱ्या दरोडेखोरांची पिस्तूल हिसकावत तिनं त्यांच्यावरच रोखली; अन्...
लुटमार करू पाहणाऱ्या दरोडेखोरांची पिस्तूल हिसकावत त्यांच्यावरच रोखली. अकोल्यातील चंचल जोशी या महिलेचा पराक्रम मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे घडली घटना. तिनही आरोपी पोलिसांकडून अटकेत

अकोला : अनेक चित्रपटांत तुम्ही एक 'सीन' अनेकदा पाहिला असेल. एखाद्या निर्जनस्थळी डाकू एखादी गाडी अडवतात. त्यांची लुटालूट सुरु असते. तितक्यात चित्रपटातील 'नायका'ची 'एंट्री' होते. अन 'तो' नायक या सर्व गुडांची 'धुलाई' करीत लोकांची या संकटातून सोडवणूक करतो. 'रिल लाईफ' चित्रपटातलं हे दृष्य प्रत्यक्षात 'रियल लाईफ'मध्ये घडलं आहे. या घटनेत लोकांना वाचविणारा 'नायक' नव्हता. तर ती होती 'नायिका'... अन् या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचं 'लोकेशन' होतं. मध्यप्रदेशातील ओंकारेश्वरजवळच्या शिवकोठी गावाजवळचं. अन् या घटनेत तब्बल तीन दरोडेखोरांवर बाजी पलटवणारी 'नायिका' होत्या अकोल्यातील चंचल नितीन जोशी.
अकोल्यातील नितीन जोशी हे पत्नी, कुटुंबिय आणि एका मित्रासह मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे देवदर्शनासाठी गेले होते. मात्र, देवदर्शन आटोपून ओंकारेश्वर येथून अकोल्याकडे परतीच्या प्रवासात त्यांच्यावर एक मोठा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ओंकारेश्वरवरून समोर निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवर तीन दरोडेखोरांनी धावा बोलला. रविवारच्या रात्री हा थरार घडला. 'त्या' दरोडेखोरांनी या कुटुंबियांवर थेट पिस्तूल रोखत लुटमार सुरु केली. 'त्या' दरोडेखोरांनी एकाची सोनसाखळी गळ्यातून ओढलीही. मग त्यांनी आपला मोर्चा वळवला नितीन जोशी यांच्या पत्नी चंचल यांच्याकडे. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यासाठी 'त्या'तील एकाने त्यांच्यावर पिस्तूल रोखली. मात्र, धाडसी स्वभावाच्या चंचल यांनी त्या दरोडेखारावर झडप मारत त्याच्या हातातील पिस्तूल हिसकली. अन् ती पिस्तूल आपल्या हाती घेत थेट 'त्या' दरोडेखोरांवर रोखली.
या 'रणरागिणी'च्या या अनपेक्षित पवित्र्याने ते तिघेही गर्भगळीत झाले. अन् त्यांनी धूम ठोकली. मात्र, यावेळी चंचल यांच्या अचाट कर्तृत्ववाने हिंमत आलेल्या या कुटुंबाने या गुंडांचा पाठलाग केला. यातील एकाला या कुटुंबाने पकडलं. तर दोघंजण पळून गेलेत. मध्यप्रदेशातील मांधाता पोलिसांनी आता इतर दोन दरोडेखोरांनाही अटक केली आहे. या तिघांच्या अटकेने मध्यप्रदेशातील वाटमारीच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं 'त्या' रात्री?
अकोल्यातील श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे कार्यकर्ते नितीन जोशी हे पत्नी चंचल, इतर कुटुंबिय आणि श्यामबिहारी शर्मा यांच्यासह मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे महाकालेश्वराच्या दर्शनाला गेले होते. देवदर्शनावरून अकोल्याकडे परत येतांना शिवकोठी गावाजवळ त्यांच्यासोबत एक अनपेक्षित घटना घडली. या गावाजवळ कारच्या मागून आलेल्या दुचाकीवरील तीन युवकांनी त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाल्याचे सांगितले. तेव्हा कार चालवित असलेले नितीन यांचे मित्र शामबिहारी शर्मा यांनी कार थांबविली. नेमकी ही संधी साधून दुचाकीवरील तिघेजण कारजवळ आलेत. अन येथून सुरु झाला दहशतीचा खेळ. या तिघांनीही या सर्वांना धमकावत लुटालूट करायला सुरुवात केली. त्यांनी पिस्तूल, चाकू आणि पेचकसचा धाक दाखवून शामबिहारी शर्मा यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. दरम्यान, त्यांच्यातील एकाने नितीन जोशी यांच्या पत्नी चंचल जोशी यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न केला. येथूनच सर्व बाजी पलटली. या दरोडेखोरांना आपण एका रणरागिणीशी पंगा घेतल्याची जाणिव झाली. चंचल जोशी यांनी गुंडाच्या हातातील पिस्तूलवर झडप टाकून ती हिसकली. ती थेट या तिघांवरही रोखली. चंचल यांच्या रूद्रावताराने ते दरोडेखार पार गांगरून गेलेत. इकडे आता सोबतच्या कुटुंबियांमध्येही मोठं बळ संचारलं होतं. आता या दरोडेखोरांसमोर पळून जाण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. ते तिघेही आपल्या मोटरसायकलने पळून जावू लागलेत.
तिघांचा केला पाठलाग, एकाला पकडले
या प्रकाराने घाबरुन जावून गुंडांनी घटनास्थळावरून मोटारसायकलने पळ काढला. मात्र तेवढ्याच तातडीने शामबिहारी शर्मा यांनी कार सुरु करुन त्यांचा पाठलाग सुरु केला. गणेशनगरजवळ दुचाकीला कारने धडक दिली. या धडकेमुळे गुंड खाली पडले. मोटारसायकल सोडून पळू लागले. तेव्हा जोशी आणि शर्मा यांनी एकाला पकडले. तर इतर दोन जण फरार झाले होते.
तिन्ही दरोडेखोर अटकेत, पिस्तूल जप्त
या घटनेची माहिती इतर यात्रेकरूंनी मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील मांधाता पोलिसांना दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत जोशी कुटुंबियांच्या ताब्यातील एकाला अटक केली. त्यांनी चंचल यांनी या दरोडेखोरांकडून हिसकलेलं पिस्तूलही ताब्यात घेतलं. नंतर अटकेतील एका दरोडेखोराच्या सहायानं त्याच्या इतर दोन साथीदारांनाही पोलिसांनी लगतच्या जंगलातून अटक केली आहे. या आरोपी दरोडेखोरांची नावे प्रबुद्ध गुजर, अभिषेक राजपूत आणि सुरेश नायक अशी आहेत. या तिघांच्या अटकेने मध्यप्रदेशातील वाटमारीच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे.
चंचल यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक
'रणरागिणी' चंचल जोशी यांची समयसुचकता आणि धाडसामुळे हे कुख्यात दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात आलेत.याबद्दल मध्यप्रदेश पोलिसांनीही त्यांचं कौतुक करीत आभार मानलेत. यासोबतच चंचल यांचे कुटुंबिय, नातेवाईक आणि अकोल्यातील आप्तेष्टांनीही चंचल यांच्या अनोख्या धाडसाचं कौतूक केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
