Raj Thackeray : मनसेचा एक नगरसेवक एवढं काम करतोय, मग राज साहेबांच्या हातात राज्याची सत्ता दिली तर...; वसंत मोरेंचे विश्वास
Vasant More : राज ठाकरेंनी केलेल्या मशिदीच्या भोंग्यासंबंधी वक्तव्यावर वसंत मोरेंनी एक शब्दही काढला नाही.

ठाणे: कोरोना काळातील मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर सरकारचा कारभार सुधारला. पुण्यातील माझं काम पाहून गेल्या चार पाच दिवसात अनेक पक्षांकडून ऑफर आल्या. मग मनसेचा एक नगरसेवक एवढं काम करतोय तर राज साहेबांच्या हातात राज्याची सत्ता दिली तर अमेरिकेतून आपल्याला मागणी येईल असा विश्वास मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केला. ते ठाण्यातील राज ठाकरेंच्या 'उत्तर' सभेत बोलत होते. राज ठाकरेंनी केलेल्या मशिदीच्या भोंग्यासंबंधी वक्तव्यावर वसंत मोरेंनी एक शब्दही काढला नाही हे विशेष.
कोरोना काळात फक्त मनसे काम करत होते, इतर पक्षाचे सर्व नेते घरात बसले होते. पुणे शहरात मनसेने जी भूमिका घेतली त्याची नोंद महाराष्ट्राने घेतली. सरकारने जी कामं करायला हवी होती ती मनसेने केली. सरकार मागे पडत होतं त्यावेळी मनसे पुढे आली होती. कोरोना काळानंतर गरिबांना फायनान्सवाल्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, त्यावेळी फक्त मनसेची दारं उघडी होती. लोकांना अडचणी येतात त्यावेळी मनसेवाला डोळ्यासमोर येतात. मग निवडणुकीत असं काय होतंय की मनसेवाला आठवत नाही.
राज ठाकरेंच्या मशिदीच्या भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केलेल्या वसंत मोरे यांनी सोमवारी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आपण मनसेतच काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आजच्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या दहा दिवसांत राज ठाकरे यांची ठाण्यात आज दुसरी सभा होत आहे.
मनसेनं या सभेला उत्तर सभा असं म्हटलंय. या सभेचा दुसरा टीझर मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात असे विधानं शरद पवार यांनी करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवलं होतं. त्यामुळें हाच गैरसमज खोटा ठरवण्याची तयारी केल्याचे लगेच जाहीर झालेल्या ठाण्याच्या सभेवरून दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष आणखी काय बोलतात याविषयी राज्यभरात नक्कीच उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
