Shivsena : 'गनिमी काव्यानं घेणार दसरा मेळावा', शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे ओपन चॅलेंज
Shivsena : शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तसेच गटनेते अजय चौधरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवाजी पार्कवरच होणार असे सांगत शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिले आहे.

Shivsena : शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही मुंबई महापालिकेने (Mumbai Muncipal Corporation) परवानगी नाकारली आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) तसेच शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवतीर्थ (शिवाजी पार्क) येथेच होणार असे सांगत शिंदे गटाला आव्हान दिले आहे. तर पेडणेकर यांनी शिंदे गट रडीचा डाव खेळत आहेत, हा डाव भाजपाच्या माध्यमातून खेळला जातोय अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाकडून कुणाला हिरवा कंदील मिळणार? हे उद्या 23 सप्टेंबरला स्पष्ट होणार आहे.
दसरा मेळावा हा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार - शिवसेनेचे ओपन चॅलेंज
मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार, असे सांगत शिंदे गटाला आव्हान केले आहे. असं माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि अजय चौधरी यांनी म्हटलंय. दरम्यान, शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील आज सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय
किशोरी पेडणेकर एबीपी माझासोबत बोलताना म्हणाल्या, शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये परवानगी मिळालेली असतानाही शिवाजी पार्कसाठी परवानगी मागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मानायचं मात्र शिवसेनेची गळचेपी करायची, पक्षातील दलबदलू लोकं आज आमदार-खासदार झाले, ते बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय. भाजपामध्ये सुद्धा अनेक चेहरे आहेत. पण त्यांच्या नावाने मतं मिळणार नाही अस जेव्हा त्यांना वाटायला लागलं तेव्हा बाळासाहेबांचे विचार पुढे केले जात आहे असा आरोप पेडणेकर यांनी शिंदे गट तसेच भाजपावर केला. त्यामुळे रडी आणि कळीचा डाव खेळला जातोय. हा डाव भाजपच्या माध्यमातून खेळला जातोय. शिवसेनेसाठी शिवतीर्थ हा परंपरेचा भाग आहे. गेली 56 वर्षे कोविडची 2 वर्षे सोडली तर दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असे समीकरण आहे. मात्र कालच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर लगेच मनपाने आज परवानगी नाकारली.
हायकोर्टाकडून कुणाला हिरवा कंदील मिळणार?
1966 सालापासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कच्या मैदानावरच घेण्यात येतो. मात्र यंदा मात्र शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाकडून कुणाला हिरवा कंदील मिळणार? हे उद्या 23 सप्टेंबरला स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून कोणालाच दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचं पत्र पाठवण्यात आले आहे.
मुंबई पालिकेनं काय म्हटलंय पत्रात?
दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला आहे, या पार्श्वभूमीवर कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास, शिवाजीपार्कच्या कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उप आयुक्त, (परि.-2) या पदावरील प्राप्त अधिकारांचा वापर करुन दसरा मेळावा साजरा करण्याकरिता प्राप्त झालेला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे असं म्हटलंय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
