(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील 300 जिल्हा परिषद शाळा होणार 'आदर्श शाळा'
शैक्षणिक गुणवत्तेसाठी नवनिर्मितीला चालना देणारे, वैज्ञानिक वृत्ती,संवैधानिक मूल्ये, , संभाषण कौशल्ये, या सारखी कौशल्ये या शाळांत विकसित करण्यात येणार आहेत. या आदर्श शाळांमध्ये पुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित आहे.
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 300 शाळा या 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. या शाळा निश्चित निकषानुसार किमान प्रत्येक तालुक्यातील एक शाळानुसार या शाळांमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग असतील अशा निवडण्यात आल्या आहेत. या शाळा आदर्श शाळा म्हणून निवड करण्यासाठी आदर्श शाळा निर्मितीचे मुख्य तीन भाग असतील यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि आवश्यक प्रशासकीय बाबींचा समावेश असणार आहेत.
विद्यार्थ्यांना ताण विरहित उत्तम शिक्षणाचे वातावरण मिळावे आणि पाठ्यपुस्तके, दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन शाळेच्या परिसरात उपलब्ध साधन सामग्रीतून ज्ञान अवगत करता यावे हा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे. या शाळांची निर्मिती करताना भौतिक सुविधांमध्ये स्वतंत्र शौचालये, आयसीटी लॅब, ग्रंथालय, सायन्स लॅब, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य यांसारख्या भौतिक सुविधा आवश्यक असणार आहेत. शैक्षणिक गुणवत्तेसाठी नवनिर्मितीला चालना देणारे, वैज्ञानिक वृत्ती,संवैधानिक मूल्ये, , संभाषण कौशल्ये, या सारखी कौशल्ये या शाळांत विकसित करण्यात येणार आहेत. या आदर्श शाळांमध्ये पुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा, गणित विषयातील मूलभूत संकल्पना, त्यात वाचन लेखन, गणिती प्रक्रिया येणे अनिवार्य असणार आहे. शाळेच्या ग्रंथालयांमध्ये पूरक वाचनासहित, गोष्टींची पुस्तके, संदर्भ ग्रंथ, इनसायक्लोपीडिया उपलब्ध असणार आहेत. तसेच स्वयं अध्ययनासोबत गट अध्ययन यासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत.
भविष्यात आदर्श शाळेकडून पाहून इतर शाळा सोडून आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश देण्यासाठी तयार होतील त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व कसे घडवता येईल व सर्वांगीण गुणवत्ता विचारत घेऊन नवनवीन उपक्रम या शाळांमध्ये सुरू करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. शिक्षकांची काम करण्याची इच्छा असेल, बदलीने येण्याची तयारी असेल, किमान वर्षे तेथे काम करण्याची तयारी असेल अशी शाळा ही आदर्श शाळा असणार आहे. येथे मुलांचा शारीरिक, बौद्धिक , मानसिक विकास शिक्षणातून करणे हे या शाळेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे शाळांतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना येथील सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
त्यासोबत दर शनिवारी 'दप्तर मुक्त शाळा' हा उपक्रम या आदर्श शाळेत राबवून शाळेतील उपलब्ध सामग्रीचा वापर करत विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल ? यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शिक्षण विभागाने आदर्श शाळा म्हणून निर्मिती करण्यात येणाऱ्या तीनशे शाळांची यादी तयार केली आहे. यादीमधील शाळांची निकषांद्वारे पडताळणी करून काही बदल असल्यास 6 नोव्हेंबरपर्यंत शिक्षण विभागाला कळवायचे आहे.