(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur News : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला वीस वर्षे कारावास
Latur Crime News : लातूरच्या निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील (Latur District) चाकूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अधिकारी कार्यक्षेत्रातील एका गावातील पीडित मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाने सादर केलेले साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने 19 मे रोजी हा निकाल दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या मुलाचे तिच्या घरी येणे-जाणे होते. पीडित मुलीची आई सात वर्षांपूर्वी मृत झाली असून, घरी तिची बहीण, भाऊ व वडील राहतात. वडील शेती करतात. ते रात्री झोपण्यासाठी शेतात जातात. या बाबीचा गैरफायदा घेऊन फेब्रुवारी 2020 मध्ये रात्रीच्या वेळी घरात शिरून तुझ्याशी लग्न करतो म्हणून आरोपीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. मुलीने नकार दिला तरी बळजबरी केली. कुणाला सांगू नकोस म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
फेब्रुवारी 2020 मध्ये रात्रीच्या वेळी घरात शिरून पीडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने पुन्हा पीडितेशी संबंध ठेवले. घाबरलेल्या मुलीने याबाबत कुणलाच काहीही सांगितले नाही. मात्र काही दिवसांनी पीडिता गरोदर राहिली. सरकारी दवाखान्यात प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ लगेच मृत झाले. त्यामुळे हे सर्व प्रकरण समोर आले. दरम्यान त्यानंतर घडलेला सर्व प्रकार मुलीने वडिलांना सांगितला. त्यामुळे या प्रकरणात 5 सप्टेंबर 2020 रोजी तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर पोलिसात कलम 376, 2 एन, 376,3, 3,452, 506 भादंवि व बाललैंगिक प्रतिबंध अत्याचार कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
साक्षी पुरावे महत्वाचे ठरले...
दरम्यान पोलिस उपनिरीक्षक मल्लया स्वामी यांनी तपासादरम्यान पीडित मुलगी, आरोपी व पीडित मुलीने जन्म दिलेल्या बाळाचे डीएनए नमुने प्रयोगशाळेत पाठविले. वैद्यकीय तपासणी व पीडितेच्या जन्माबाबतचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाने 12 साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यांमध्ये सरकार पक्षाने पीडित मुलीचे वय 16 वर्षांच्या खाली असल्याचे मुख्याध्यापकांच्या साक्षीतून व जन्मदाखल्यातून सिद्ध झाले. पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, मुलीच्या सावत्र आईचा जबाब व तपास अधिकारी यांची साक्ष तसेच न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य धरून निलंगा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. एम. नागलकर यांनी आरोपीस वीस वर्ष कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता कपिल विजय पंढरीकर यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. व्ही. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एल. यु. कुलकर्णी व कोर्ट पेहरवीकर व्ही. बी. कोंपले यांनी मदत केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
अनैतिक संबंध पाहणाऱ्या तरुणाची गळा आवळून हत्या; बदनामीच्या भीतीनं जोडप्यानं घेतला जीव