(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugar Price Hike : साखरेच्या वाढत्या किंमतीला बसणार आळा? सरकार घेऊ शकते मोठा निर्णय
Sugar Price : वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी यापूर्वीच केंद्र सरकारने गहू आणि आटा निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. आता साखरेच्या वाढत्या किंमतींमुळे केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावण्याच्या विचारात आहे.
Sugar Price Hike : देशांतर्गत बाजार पेठेत साखरेच्या किंमतींमध्ये होत असलेली वाढ पाहता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. साखरेचे वाढते दर कमी करण्यासाठी सरकार साखरेच्या निर्यातीवर मर्यादा आणू शकते. सरकार या हंगामात 10 दशलक्ष टन साखर निर्यात करण्याची मर्यादा निश्चित करू शकते. हा निर्णय घेतल्यास साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लादण्याची सहा वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार 23 मे रोजी देशांतर्गत बाजारात साखरेची सरासरी किंमत 41.58 रुपये प्रति किलो होती. तर कमाल किंमत 53 रुपये प्रति किलो आणि किमान किंमत 35 रुपये प्रति किलो आहे.
वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी यापूर्वीच केंद्र सरकारने गहू आणि आटा निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. आता साखरेच्या वाढत्या किंमतींमुळे केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावण्याच्या विचारात आहे. या निर्णयाची घोषणा सरकारकडून लवरच करण्यात येण्याची शक्यता आहे.
जगभरातील साखर उत्पादन देशांपैकी भारत हा साखरेचे उत्पादन करणारा मोठा देश आहे. जगभरात साखर निर्यात करण्यात ब्राझीलचा पहिला क्रमांक लागतो. तर साखरेच्या निर्यातीसाठी भारत जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान भारताने 7.1 दशलक्ष टन साखर निर्यात केली आहे. मे महिन्यात 8 ते 10 लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. 2021-22 मध्ये 90 लाख टन साखर निर्यात होण्याची अपेक्षा आहे. तर यापूर्वी 72 लाख टन साखर निर्यात झाली होती. परंतु, वाढते साखरेचे दर पाहाता केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर मर्यादा आणू शकते. असे झाल्यात वाढत्या किंतीतून दिलासा मिळेल.
साखर निर्यातीवर निर्बंध लावण्यात येणार असल्याच्या वृत्तानंतर साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सला मोठा फटका बसला आहे. दालमिया भारत शुगरच्या शेअरमध्ये 6.99 टक्के, शक्ती शुगर्सच्या शेअरमध्ये 6.30 टक्के, श्री रेणुका शुगर्सच्या शेअरमध्ये 6.66 टक्के, बलराम चिनीच्या शेअरमध्ये 6.66 टक्क्यांनी घट झाली आहे.