Shaktikanta Das : RBI मधून निवृत्त झाल्यावर शक्तिकांत दास यांच्याकडे मोठी जबाबदारी, मोदींचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार
Shaktikanta Das : 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या शक्तिकांत दास यांनी आरबीआय गव्हर्नर पदासह केंद्रातील महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

Shaktikanta Das : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) गव्हर्नर पदावरून निवृत्त झाल्यानंतर शक्तीकांत दास यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शक्तिकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम करतील. तशा आशयाचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. शक्तिकांत दास हे पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव असतील. 2019 सालापासून पी के मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करतील.
RBI गव्हर्नर म्हणून सहा वर्षे सेवा केल्यानंतर शक्तिकांत दास डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले. आता प्रधान सचिव या नात्याने ते पंतप्रधानांना प्रमुख आर्थिक धोरणात्मक सल्ला देण्याची भूमिका बजावतील.
Former RBI Governor Shaktikanta Das, appointed as Principal Secretary-2 to Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/uUWt7SfLjj
— ANI (@ANI) February 22, 2025
सहा वर्षे आरबीआयचे गव्हर्नर
शक्तिकांत दास हे 1980 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आरबीआयच्या गव्हर्नरपदी त्यांनी 2018 ते 2024 या दरम्यान काम केलं. कोविड-19 महामारी आणि त्यानंतरच्या देशाची आर्थिक सुधारणा यासह महत्त्वपूर्ण आर्थिक आव्हानांचा सामना करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2021 मध्ये केंद्र सरकारने शक्तीकांत दास यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर होते.
शक्तीकांता दास हे ओडिशाची राजधानी भुवनेश्वरचे रहिवासी आहेत. ते तामिळनाडू केडरचे 1980 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारसाठी विविध पदांवर काम केले. केंद्रात त्यांनी विविध टप्प्यांवर आर्थिक व्यवहार सचिव, महसूल सचिव आणि खत सचिव म्हणून काम केले.
शक्तिकांत दास आरबीआयच्या गव्हर्नरपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी महसूल विभागाचे सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

