(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय फ्लाईटमध्ये अमेरिकन जॅझ प्रमाणे भारतीय संगीत वाजणार, नागरी उड्डाण मंत्रालयाचं सर्व एअरलाईन्सला पत्र
यापुढे भारतीय विमानांमध्ये प्रवाशांना भारतीय संगीताचा आनंद घेता येणार आहे. तशा प्रकारचे पत्र नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना पाठवलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. गाड्यांच्या हॉर्नमध्ये बदल करण्यात येणार असून यासाठी लवकरच नवीन नियम बनवले जाणार असल्याचं गडकरींनी सांगितलं होतं. त्यानंतर आता नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना उड्डाणांच्या ठिकाणी आणि टर्मिनल परिसरात भारतीय संगीत वाजविण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सने (ICCR) नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भारतीय वाहकांनी चालवल्या जाणार्या फ्लाइट्सवर भारतीय संगीताचा प्रचार करण्याची विनंती केली होती. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी सर्व एअरलाईन्स आणि विमानतळांना एक पत्र लिहिले आणि जगभरातील बहुतेक एअरलाइन्सद्वारे वाजवले जाणारे संगीत हे ज्या देशाची एअरलाइन्स आहे त्या देशासाठी सर्वोत्तम ठरत असल्याचं नमुद केलं. उदाहरणार्थ, अमेरिकन एअरलाइन्स जॅझ वाजवतात किंवा ऑस्ट्रियन एअरलाइन्स मोझार्ट वाजवतात आणि मध्य पूर्व एअरलाईन्स अरब संगीत वाजवतात.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "भारतीय एअरलाईन्स क्वचितच उड्डाणात भारतीय संगीत वाजवतात, आपल्याकडे संगीताचा समृद्ध वारसा आणि संस्कृती आहे. यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.”
हॉर्नचा कर्कश आवाज बंद होणार?
लवकरच तुम्हाला कारच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाऐवजी भारतीय वाद्यांच्या वादनाचा मधुर आवाज ऐकू येईल. काही दिवसांपूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हॉर्नच्या आवाजावर नाराजी व्यक्त करत हॉर्नचा आवाज बदलण्याचे काम विभाग करत असल्याचे त्यांनी सांगितलं..हॉर्नच्या आवाजामध्ये तबला, पेटी, व्हायोलिन, बिगूल, तानपुरा, बासरी यासारख्या वाद्यांच्या आवाजाचा समावेश करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. हे नियम थेट वाहन निर्मात्या कंपन्यांसाठी असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :