IPL 2025 GT vs MI: गुजरातचा प्रसिद्ध विजय

IPL 2025 Gujarat Titans vs Mumbai Indians: आज झालेल्या गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात गुजरातने आपल्या विजयाचे दिमाखात खाते उघडले. काळया मातीची खेळपट्टी बघून मुंबईचा कर्णधार हार्दिक ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.जसप्रीतच्या अनुपस्थितीत मुंबईची गोलंदाजी सामान्य वाटते त्यात मुंबईमधील क्षेत्ररक्षकांनी त्यांच्या गचाळ क्षेत्रक्षणाने १५ ते २० धावांचे दान गुजरातच्या पारड्यात टाकून आपला शेजारधर्म निभावला.
गुजरातकडून सुरुवात फार वेगात नसली तरी ती संथ सुद्धा नव्हती.पहिल्या पॉवर प्ले मध्ये त्यांनी धावफलकावर बिनबाद ६६ धावा लावून आपल्या विजयाचा पाया तिथेच रचला. यंदाची आय पी एल जसे डावखुरे फिरकी गोलंदाज गाजवित आहे तसेच ती डावखुरे शैलीदार फलंदाज देखील गाजवत आहेत...आणि गुजरातचा साई सुदर्शन त्यात अग्रस्थानी आहे..तमिळनाडूचा हा गुणी फलंदाज किती शैलीदार आणि मनमोहक फटके मारतो...त्याच्याकडे चांगला ऑन ड्राईव्ह आहे...चांगला फ्लिक आहे...आणि तितकाच चांगला स्वीप देखील..तुमच्या तंत्राची बैठक उत्तम असली की तुमचे भक्कम तंत्र तुमच्या पायातील बेड्या न होता ती ताकत होते हे साई सुदर्शन ने वारंवार दाखवून दिले आहे...अहमदाबाद हे त्याचे आवडते मैदान आहे .इथे गेल्या चार डावात त्याचे १ शतक आणि ३ अर्धशतके आहेत...आज सुद्धा त्याच्या धावांचे सुदर्शन मुंबई संघावर पडले. गिल बाद झाल्यावर बटलर आणि सुदर्शन यांच्यामध्ये वेगवान ५० धावांची भागीदारी झाली . याचा परिणाम म्हणून त्यांच्या १९६ धावा झाल्या..
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई च्या संघाला पॉवर प्ले मध्ये वेगवान सुरुवातीची गरज होती. परंतु चॅम्पियन ट्रॉफीसाठी आपली निवड न झाले चे शल्य मनात बाळगून मोहम्मद सिराज ने आपल्याच कर्णधाराला पहिल्या शतकात तंबूचा रस्ता दाखवला...आणि त्याच्या नंतर दुसरा सलामीवीर बाद करून मुबई ला बॅकफूट वर ढकलले.. वेगवान गोलंदाजाचा आत येणारा चेंडू ही रोहित ची कमजोरी राहिली आहे ..आणि सिराज ने एक शार्प इन्स्विंगर टाकून आपल्या नियमित कर्णधाराला तंबूत पाठविले...तिथून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला ... सिराज ला आपल्या आवडीचा पिकप शॉट षटकार मारून आणि साई किशोरला आवडीचा इनसाईड आउट कव्हर मधून षटकार वसूल करून सूर्याने आपण चांगल्या फॉर्म मध्ये आहोत हे दाखविले...परंतु १२ व्या षटकात शुभ मन याने प्रसिद्ध कृष्णाला गोलंदाजीसाठी आणले... आणि आपल्या पहिल्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने तिलक वर्मा याला बाद करून मुंबईला तिसरा हादरा दिला. ....त्याच्यानंतर या खेळपट्टीवर चांगले ऑफ कटर टाकून त्याने मुंबई च्या आक्रमणाला लगाम घातला तो अगदी शेवट पर्यंत...१५ षटकात केवळ 114 धावा तेव्हा सरासरी 16 च्या वर गेली आणि मुंबईच्या हातून सामना निसटला...गुजरातच्या प्रसिद्ध ने आपल्या कारकीर्दीतील एक सर्वोत्तम स्पेल टाकला.. त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण होते ४ षटके १८ धावा आणि २ बळी...या कामगिरीवर त्याला सामनावीराचा बहुमान जर मिळाला नसता तर नवलच...आज मुंबई संघाची संघ निवड करीत असताना विघ्नेश पुथुर याला अंतिम ११ मध्ये का खेळविले नाही. खेळपट्टी मंद असताना मीचल सॅट्नर ला पूर्ण चार षटके गोलंदाजी का दिली नाही हे सुद्धा कोडेच आहे.. ही स्पर्धा दहा संघांमध्ये खेळवली गेल्यापासून मुंबई संघाला त्यांची नेहमीप्रमाणे संथ सुरुवात परवडणारी नाही ...लवकरात लवकर त्यांना त्यांच्या विजयाची गुढी उभारावी लागेल.... अन्यथा गेल्या वर्षी प्रमाणे तळाच्या एखाद्या स्थानात समाधान मानावे लागेल.
























