खाकी वर्दीत कर्तव्य पार पाडलं अन् आंदोलनासाठी आलेल्या हजारो शेतकऱ्यांची सुद्धा कोणाला कळूही न देता जेवणाची सोय; राजू शेट्टींनी सांगितला सुधाकर पठारेंचा हृदयस्पर्शी किस्सा
राजू शेट्टी यांनी एफआरपीची न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर सुद्धा शेट्टींचे यांचे सहकारी वकील योगेश पांडे यांच्याशी काही दिवसांपूर्वीच सुधाकर पठारे यांनी चर्चा करून शुभेच्छा दिल्या होत्या.

मनमिळावू व दिलदार मित्रास गमावल्याचं अतिव दुःख
दरम्यान, सुधाकर पठारे यांच्या अकाली निधनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शोक व्यक्त करताना त्यांच्यातील खाकीमध्ये नेहमीच जिवंत ठेवत असलेल्या माणसाचे दर्शन घडवले. सुधाकर पठारे आयपीएस होण्यापूर्वी शासनाच्या विविध विभागात जबाबदारी पार पडली होती. राजू शेट्टी यांनी एफआरपीची न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर सुद्धा शेट्टींचे यांचे सहकारी वकील योगेश पांडे यांच्याशी काही दिवसांपूर्वीच सुधाकर पठारे यांनी चर्चा करून शुभेच्छा दिल्या होत्या. मनमिळावू व दिलदार मित्रास गमावल्याचं अतिव दुःख असून चळवळीसाठई त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मृतीत राहणारं असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?
आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी कानावर पडताच क्षणभर धक्का बसला. पोलिस दलात काम करत असताना शेतकरी चळवळीकरिता त्यांनी दिलेले योगदान कायम स्मृतीत राहणारे आहे. आज चळवळीचा वटवृक्ष झाला आहे या चळवळीचे रोपटे लावत असताना या रोपट्यास ज्या ज्ञात- अज्ञात लोकांनी पाणी घातले त्यामध्ये सुधाकर पठारे यांचे योगदान मोठे होते. कोल्हापूर जिल्ह्यात ते पोलिस उपअधिक्षक पदावर कार्यरत असताना आमची अनेक आंदोलने झाली. त्यावेळी त्यांनी स्व:त कृषी पदवीधारक असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना माहित होत्या. त्यामुळे अप्रत्यक्ष त्यांनी खूप मदत केली.
मी आमदार असताना अनुसूचित जाती जमातीच्या कमिटीबरोबर चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते त्याठिकाणी अपर पोलिस अधिक्षक या पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी कोळसा खाणी प्रकल्पांची स्वत: सोबत फिरून माहिती दिली होती. यानंतर साखर आयुक्त कार्यालयात राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी साखर आयुक्त कार्यालयाची मोडतोड होवून त्याठिकाणी मोठा राडा झाला. हजारो शेतकरी त्यावेळेस त्याठिकाणी मोर्चास उपस्थित होते.
हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तत्कालीन आमदार स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी शेतकऱ्याना वडा पाव नाश्ता म्हणून दिला. मात्र दुपारनंतर शेतकरी भुकावलेले त्यावेळेस जवळपास सर्व शेतक-यांना पुरेल एवढे जेवणाची सोय त्याठिकाणी करण्यात आली होती सर्व शेतकरी पोटभर जेवले व सायंकाळी आम्हाला सोडण्यात आले. जेव्हा दोन दिवसांनी मी विचारणा केली कि जेवणाची सोय कुणी केली तर ॲड.योगेश पांडे म्हणाले की, साहेब पोलिस अधिकारी सुधाकर पठारे साहेबांनी सर्व शेतक-यांची जेवणाची व्यवस्था केली होती. क्षणभर मी भारावलो व लगेच पठारे साहेबांना फोन केला.
साहेब तुम्ही एवढ्या शेतक-याना कशी व्यवस्था केलात. त्यावेळी ते मला म्हणाले की, मला माहीत होतं की उद्या हजारो शेतकऱ्यांचा साखर संकुलावर मोर्चा येणार आहे. तुम्ही केलेली मागणी योग्य होती, पण तरीही प्रशासन म्हणून व कायदा व सुव्यस्थेसाठी मला तुमच्यावर नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागणार होते. यामुळे माझ्या खाकी वर्दीमधील माणसाने मला जाणीव करून दिली व मी स्वत: कृषी पदवीधारक असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहिल्या आहेत. तुम्ही योग्य लढाई लढत आहात, पण त्या लढाईस बळ देण्याची तितकीच जबाबदारी माझ्यावर होती. म्हणून मी एक दिवस आधीच ठरवले होते कि उद्या शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था आपण करायची व मी त्यापध्दतीने ती व्यवस्था केली.
चळवळीवर असलेले त्यांचे प्रेम हे त्यांनी कधीच कमी केले नाही. चळवळीच्या चढ उतारीच्या प्रवासात ते शेवटपर्यंत सोबत राहिले. काही दिवसापूर्वी एफआरपीची न्यायालयीन लढाई जिंकल्याबद्दल त्यांनी ॲड. योगेश पांडे यांच्याशी चर्चा करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. अशा या मनमिळावू व दिलदार मित्रास गमावल्याचं अतिव दुःख मला झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















