GT vs MI IPL 2025 : 'मुंबई'वर गुजरातच भारी! हार्दिक पांड्याच्या टीमचा 'लाजेलाही लाजवणारा' लाजिरवाणा पराभव
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी सहज पराभव केला.

Gujarat Titans vs Mumbai Indians, 9th Match : गुजरात टायटन्सने अखेर आयपीएल 2025 मध्ये आपले खाते उघडले. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी सहज पराभव केला. अशाप्रकारे, गुजरातला हंगामातील दुसऱ्या सामन्यात पहिला विजय मिळाला. त्याच वेळी, कर्णधार हार्दिक पांड्याचे पुनरागमन मुंबईला विजय मिळवून देऊ शकले नाही आणि संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. साई सुदर्शनच्या शानदार खेळी आणि त्यानंतर पॉवरप्लेमध्ये मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीमुळे शुभमन गिलच्या संघाने पाच वेळा चॅम्पियन संघाचा पराभव केला.
Match 9. Gujarat Titans Won by 36 Run(s) https://t.co/lDF4SwnuVR #GTvMI #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
शुभमन गिल आणि साई सुदर्शनचा तडाखा!
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सुरुवातीलाच एमआयचा निर्णय चुकीचा सिद्ध केला, कारण गुजरातने पॉवरप्लेमध्येच एकही विकेट न गमावता 66 धावा केल्या. हार्दिक पांड्याने गिलला बाद केले, जो 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिल व्यतिरिक्त जोस बटलरनेही 24 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले.
17 षटकांत गुजरात टायटन्सचा स्कोअर 3 गडी गमावून 170 धावा असा होता. पण त्यानंतर, गुजरातच्या फलंदाजांना 3 षटकांत फक्त 26 धावा करता आल्या आणि एकूण 5 विकेट गमावल्या. ज्यामुळे गुजरातला 200 पेक्षा कमी धावसंख्येवर रोखले. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या आहेत. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
नंतर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने घातला तांडव!
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात त्यांनी रोहित शर्मा (8) ची विकेट पडली, त्याला मोहम्मद सिराजने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर सिराजने रायन रिकेलटनला आऊट करून बॅकफुटवर ढकललं. येथून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. तिलक वर्माने 36 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या.
तिलक वर्माला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने धावबाद केले. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला रॉबिन मिंज फार काही करू शकला नाही आणि फिरकी गोलंदाज आर. साई किशोरने त्याला आऊट केले. मिंज आऊट झाला तेव्हा मुंबईची धावसंख्या चार बाद 108 धावा होती. येथून, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यावर गतीने धावा करण्याची जबाबदारी होती, परंतु दोन्ही खेळाडू महत्त्वाच्या क्षणी आऊट झाले. सूर्यकुमारने 28 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 48 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याला फक्त 11 धावा करता आल्या. नमन धीरने 11 चेंडूत 18 धावा केल्या तर मिचेल सँटनरने 9 चेंडूत 18 धावा केल्या पण ते फलंदाजीला आले तोपर्यंत आवश्यक धावगती गगनाला भिडली होती. गुजरातकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. कागिसो रबाडा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे ही वाचा -





















