अंबाजोगाईतील ऐतिहासिक बुरूजावर पहिल्यांदाच ध्वजारोहण, मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली
Hyderabad Liberation Day : अंबाजोगाई येथील शहा बुरुजाला ऐतिहासिक महत्व असून या बुरुजाला शाही बुरुज किंवा लमाण बुरुज असेही म्हणतात.
बीड : अंबाजोगाईतील ऐतिहासिक बुरूजावर आज पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील (Marathwada Liberation Day) हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. निजाम राजवटीमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील एतिहासिक बुरजाखाली निजामांचा कायम तळ असायचा. याच शहा बुरजाखाली निजाम सैनिक आणि सामान्य नागरिक रेडिओच्या माध्यमातून युद्धाच्या बातम्या ऐकण्यासाठी जमा व्हायचे.
अंबाजोगाई येथील शहा बुरुजाला ऐतिहासिक महत्व असून या बुरुजाला शाही बुरुज किंवा लमाण बुरुज असेही म्हणतात. 1942 साली या बुरूजावर सरकारने रेडिओ बसवला आणि याच बुरुजाखाली रेडिओच्या माध्यमातून बातम्या ऐकण्यासाठी निजाम सैनिक आणि अजूबाजूच्या परिसरातील नागरिक जमा व्हायचे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने याच बुरुजाच्या उंच टोकावर मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने वतीने ध्वजारोहण करण्यात आलं. शिवाय या बुरूजा संदर्भातील इतिहासाची माहीती देणाऱ्या फलकाचे अनावरण देखील करण्यात आलं. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी अंबाजोगाई येथील नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुरुजाचा इतिहास?
निजाम राजवटीत मोमीनाबाद हे अंबाजोगाईचे निजामकालीन नाव होत. अंबाजोगाई येथे निजाम फौजेचा कायमचा तळ होता. त्यामुळे सैनिकांना युध्दाच्या बातम्या ऐकायला मिळाव्यात म्हणून शहा बुरुजावर बसवण्यात आलेला रेडिओ अंबाजोगाईतील स्वातंत्र्य सैनिक श्रीनिवास खोत यांनी उध्वस्त करून निजाम आणि ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारलं. त्या काळातच मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी अंबाजोगाईत देखील एक मोठी चळवळ राहिली होती.
1942 साली महात्मा गांधी यांनी चलेजावची घोषणा केल्यानंतर भारतातील विविध संस्थानात या चळवळीचे लोण पोहोचलं आणि हजारो लोक यामध्ये सहभागी होऊ लागले. यातच हैद्राबाद येथे स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या अनुयायांनी सत्याग्रह सुरु केला. याच सत्याग्रहापासून प्रेरणा घेत अंबाजोगाई येथे स्वामीजींनी पुनरुज्जीवित केलेल्या योगेश्वरी नूतन विद्यालयातील काही शिक्षक व विद्यार्थी या आंदोलनात उतरले. निजाम आणि ब्रिटिशा विरुद्ध घोषणा देणे, वंदे मातरम् आणि जय हिंदचे नारे देणे, विविध घोषणांनी भिंती रंगविणे, पोस्ट ऑफिस मधील पत्र पेट्या पळविणे, फोन व लाईटच्या तारा तोडणे, रेडीओ स्टेशन केंद्र उध्वस्त करणे अशा पद्धतीने प्रतिकात्मक आंदोलन केले जात होते.
महत्वाच्या बातम्या