Beed News : नाफेडकडे शेतकऱ्यांचे 209 कोटी थकले, बीडमधील सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा
Beed News : बीड जिल्ह्यातील 13 हजार 225 शेतकऱ्यांचे 209 कोटी 84 लाख रुपये नाफेडकडे अडकून पडल्याची माहिती समोर येत आहेत.

बीड : एकीकडे नाशिकमध्ये (Nashik) नाफेडला (NAFED) गोवा फेडरेशनने (Goa Federation) साडेपाच कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर दुसरीकडे बीड (Beed News) जिल्ह्यातील 13 हजार 225 शेतकऱ्यांचे (Farmers) 209 कोटी 84 लाख रुपये नाफेडकडे अडकून पडल्याची माहिती समोर येत आहेत.
सोयाबीन (Soybean) खरेदी केल्यानंतर आठ दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र नाफेड आणि वखार महामंडळाकडे पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील 20 हजार 969 शेतकऱ्यांचे सोयाबीन नाफेड मार्फत खरेदी करण्यात आले. सोयाबीन खरेदीला 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांची सोयाबीन केंद्राबाहेर गर्दी
आतापर्यंत केवळ सात हजार 644 शेतकऱ्यांचे 80 कोटी 83 लाख 70 हजार रुपये देण्यात आले आहेत. तर उर्वरित शेतकऱ्यांचे 209 कोटी 84 लाख रुपये थकले आहेत. नाफेड मार्फत सोयाबीनची खरेदी थांबविण्यात आली असली तरी नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीन केंद्राबाहेर आजही गर्दी करून आहे. नाफेडकडे शेतकऱ्यांची रक्कम रखडल्याने बळीराजा हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ नाहीच
दरम्यान, हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. या केंद्रांवरील खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत होते. लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन पडून असल्याने खरेदी केंद्राबाहेर अजूनही शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही, असे राज्याच्या पणन विभागाने स्पष्ट केले आहे.
नाफेडला साडेपाच कोटींना गंडा
दरम्यान, नाफेडची गोवा फेडरेशनकडून साडेपाच कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित काशिनाथ नाईक याने गोवा फेडरेशनच्या माध्यमातून नाफेड आणि नाशिक जिल्ह्यातील फेडरेशनकडून सुमारे 1,589 मेट्रिक टन कांदा (Onion) 35 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करून तो बाजारात चढ्या दराने विक्री करून स्वतःचा फायदा कारण घेतला. कांद्याची परस्पर विक्री करत शेतकऱ्यांची व नाफेडची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही, पणन विभागाचे स्पष्टीकरण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

