सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही, पणन विभागाचे स्पष्टीकरण
सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र तशी कोणताही मुदतवाढ देण्यात आलेली नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने सोयाबीनच्या खरेदीसाठी मुदतवाढ दिल्याचे म्हटले जात होते. मात्र आता याबाबत नवी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही, असे राज्याच्या पणन विभागाने स्पष्ट केले आहे.
नेमकी चर्चा काय होती?
मिळालेल्या माहितीनुसार याआधी सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात 24 दिवस तर तेलंगणा राज्यात एकूण 15 दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचा दावा केला जात होता. खुद्द केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनीच याबाबतचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दिनांक 6 फेब्रुवारी 2025 नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही. तसे राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्याने कोणतीही मुदतवाढ नाही
महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला 90 दिवसांचा कालावधी दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी संपला होता. त्यानंतर केंद्र शासनाने एकूण 24 दिवसांची मुदतवाढ दिली होती. या मुदतीनुसार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत सोयाबीन हमीभावानुसार खरेदी केली जात होती. त्यानंतर आता नव्याने कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.
किसान सभेचा अक्रमक पवित्रा
दरम्यान, हमीभावानुसार सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांजवळ अजूनही सोयाबीन शिल्लक आहे. मात्र खरेदीची मुदत संपल्यानंतर आता नेमके काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. हाच मुद्दा घेऊन किसान सभेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारने सोयबीन खरेदीची मुदत पुन्हा वाढवावी आणि सोयबीन खरेदी सुरू करावी, अशी मागणी किसान सभेकडून केली जात आहे. तसे न केल्यास आम्ही राज्यभरात आंदोलन करून, अशा इशाराही किसान सभेने याआधीच दिलेला आहे. असे असताना आता सोयाबीनच्या खरेदीसाठी मुदतवाढ दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढे काय होणार? असे विचारले जात आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

