अधिक मासातील विठुरायाच्या रोजच्या 45 पैकी 30 तुळशी अर्चन पूजा बंद; भर पावसात भाविकांची गर्दी
Pandharpur News : अधिक महिन्यासाठी विठुरायाच्या रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजेपैकी 30 पूजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एबीपी माझाच्या दणक्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
Pandharpur News : दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास (Adhik Maas) अर्थात पुरुषोत्तम यंदा 18 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत असणार आहे. अधिक महिन्यासाठी विठुरायाच्या (Vitthal) रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजेपैकी 30 पूजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एबीपी माझाच्या दणक्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आज पहिल्याच दिवशी भर पावसात हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने यात्रेचं स्वरुप प्राप्त झाले आहे. अशीच गर्दी वाढत गेल्यास उरलेल्या 15 तुळशी अर्चन पूजाही रद्द केल्या जातील असा निर्वाळा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिला आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
एबीपी माझाने वाचा फोडल्यानंतर मंदिर समितीचा निर्णय
अधिक मास काळात रोज होणाऱ्या 10 पाद्यपूजा बंद करण्याचा निर्णय झाला होता. मात्र रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजेबाबत मात्र कोणताच निर्णय न झाल्याने भाविकांना दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागणार होते. याबाबत भाविकांच्या भावनांना एबीपी माझाने वाचा फोडल्यानंतर अखेर मंदिर समितीने रोज होणाऱ्या 45 पैकी 30 पूजा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाविकांना दर्शनासाठी मिळणारा वेळ वाढणार
हा पुरुषोत्तम मास यावर्षी चातुर्मासाच्या कालावधीत येत असल्याने रोज यात्रेसारखी भाविकांची गर्दी असते. अशावेळी जास्तीत जास्त भाविकांना दर्शनासाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजा बंद करण्याची मागणी भाविकांतून होत होती. आता मंदिराने रोजच्या 30 पूजा रद्द केल्याने भाविकांना दर्शनासाठी मिळणारा वेळ वाढणार आहे.
उत्पन्न वाढवण्यासाठी 45 तुळशी अर्चन पूजा
मंदिराचे उत्पन्न वाढवण्यासाठी समितीने दिवसातून 3 वेळा एकूण 45 तुळशी अर्चन पूजा सुरु केल्या आहेत. यामुळे मंदिराचे जरी उत्पन्न वाढत असले तरी भाविकांना मात्र दर्शन रांगेतील याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. अधिक महिन्यासाठी रात्री होणाऱ्या 10 पाद्यपूजा मंदिर समितीने यापूर्वीच रद्द केल्या होत्या. परिणामी रात्री सडे दहा ते साडे अकरा या कालावधीत भाविकांना दर्शन मिळणार आहे. आता 30 तुळशी अर्चन पूजाही रद्द केल्याने या महिनाभरात येणाऱ्या हजारो भाविकांना दर्शन सुलभ होणार आहे. याचसोबत पावसाळा असल्याने दर्शन रांगेतील छतावर पत्रे किंवा वॉटरप्रूफ कापड बांधल्यास भाविकांना न भिजत दर्शन घेता येणार आहे.
हेही वाचा