Pandharpur News : अधिकमासमध्ये विठुरायाच्या पाद्यपूजा बंद, मात्र रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजाही बंद ठेवण्याची भाविकांची मागणी
Pandharpur News : अधिक महिन्यासाठी विठुरायाच्या पाद्यपूजा बंद राहणार मात्र रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजाही बंद ठेवण्याची मागणी भाविक करत आहेत.
Vitthal Mandir News : यंदा अधिकमास (Adhikmas) आला आहे, त्यामुळ पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल मंदिरातील (Vitthal Mandir) विठुरायाच्या पाद्यपूजा बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. विठुरायाच्या पाद्यपूजा बंद केल्यानंतर आता रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजाही बंद ठेवण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. अधिक महिन्यात रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजा बंद करा, यामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळणे सुलभ होईल, अशी भाविकांची मागणी आहे.
अधिकमासमध्ये विठुरायाच्या पाद्यपूजा बंद
दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास यंदा 18 जुलैपासून 14 ऑगस्ट पर्यंत असणार असून या काळात रोज होणाऱ्या विठुरायाच्या 10 पाद्यपूजा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मास यावर्षी चातुर्मासाच्या कालावधीत येत असल्याने रोज यात्रेसारखी भाविकांची गर्दी राहणार असून भाविकांना जास्ती तजास्त दर्शनासाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजा बंद करण्याची मागणी आता भाविकांकडून होऊ लागली आहे.
तुळशी अर्चन पूजाही बंद ठेवण्याची मागणी
मंदिराचे उत्पन्न वाढवण्यासाठी समितीने दिवसातून तीन वेळा एकूण 45 तुळशी अर्चन पूजा सुरु केल्या आहेत. यामुळे मंदिराचे जरी उत्पन्न वाढत असले तरी भाविकांना मात्र तासनतास दर्शन रांगेत प्रतिक्षेत थांबावे लागते. आता अधिक महिन्यासाठी रोज हजारोच्या संख्येने भाविक येणार असताना हा महिनाभराचा काळ या तुळशी अर्चन पूजा बंद ठेवण्याची मागणी होऊ लागल्याने आता मंदिर समिती उत्पन्न बघणार की भाविकांची सोय हे पाहावे लागणार आहे.
18 जुलैपासून अधिकमास सुरु
अधिक महिन्यासाठी (Adhikmas) रोज रात्री साडेसहा वाजता होणाऱ्या 10 पाद्यपूजा बंद केल्याने रात्री साडे दहा ते साडे अकरा या कालावधीत भाविकांना दर्शन मिळणार आहे. मात्र, दिवसातून तीन वेळा होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजेमुळे रोज किमान तीन तास भाविकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. या पूजाही बंद केल्या तर या पवित्र अधिकमास महिन्यात जास्तीत-जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आता पावसाळा सुरुवात होत असल्याने दर्शन रांगेतील छतावर पत्रे किंवा वॉटरप्रूफ कापड बांधल्यास भाविकांना न भिजत दर्शन घेता येणार आहे. अधिक महिना 18 जुलैपासून सुरु होत असताना मंदिराने अजूनही याबाबत कोणतेही निर्णय घेतलेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :