Ajit Pawar : इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar : नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत.

Ajit Pawar : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून (Guardian Minister) महायुतीत (Mahayuti) घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी 19 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीत नाराजीनाट्य सुरु झाले. नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्या नंतर नाशिकमधून गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडमधून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची नियुक्ती अवघ्या 24 तासात रद्द करण्यात आली होती. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करून दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्याप पालकमंत्रिपदाचा वाद सुटलेला नाही. नाशिकमध्ये पालकमंत्री नसल्याने नाशिकची डीपीडीसी बैठक (Nashik DPDC) गेल्या रखडली आहे. मात्र, आज मंगळवारी (दि. 11) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक डीपीडीसी बैठक घेणार आहेत. या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील गिरीश महाजनांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देऊन दोन आठवडे उलटला आहे. भाजपने नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला असताना, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटही आपला दावा सोडायला तयार नसल्याने पालकमंत्रिपदाचा पेच सुटण्याऐवजी वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यातच राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक होणे अपेक्षित असले तरी पालकमंत्रिपदाचा फैसला होत नसल्याने प्रशासकीय पातळीवरही अनास्था निर्माण झाली आहे.
अजित पवार घेणार नाशिक डीपीडीसी बैठक
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विभागांच्या बैठका उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या वतीने घेण्यात येत आहेत. आज राज्यातील विविध विभागांच्या बैठका अजित पवार घेत आहेत. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजित पवार नाशिक जिल्हा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार ऑनलाइन उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार असून या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

