Nashik News : खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62 विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील खते, बियाणे आणि किटकनाशकांच्या परवानाधारक विक्रेत्यांवर कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Nashik News : नाशिक जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत खते, बियाणे आणि किटकनाशक भेसळीत कृषी विभागाने (Agriculture Department) मोठी कारवाई केली आहे. नऊ महिन्यांत 62 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर 5 परवाने रद्द करण्यात आले असून पाच परवानाधारकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृषी विभागाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण 128 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या नऊ महिन्यांत बियाणे, खते आणि किटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. गुणनियंत्रण विभागाने बियाणांचे 3,569, खतांचे 1,638 आणि किटकनाशकांचे 1,020 नमुने संकलित करण्यात आले होते. प्रयोगशाळा चाचण्यांनंतर काही नमुने अप्रमाणित आढळले.
62 विक्रेत्यांचे परवाने निलंबित
कृषी विभागाच्या माध्यमातून गुणवत्ता तपासणीनंतर जिल्ह्यातील परवानाधारकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. नऊ महिन्यांत 62 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर 5 परवाने रद्द करण्यात आले असून पाच परवानाधारकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार बियाणे, खते आणि औषधांमध्ये होणाऱ्या भेसळीनंतर नाशिक कृषी विभागाची कारवाईची मोहीम वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. बोगस पिक विमा उतरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात 5 हजार 172 शेतकऱ्यांनी 3 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर बोगस पिक विमा उतरवल्याचे समोर आले आहे. यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पिकाची लागवड केलेली नसतानाही त्या ठिकाणच्या क्षेत्रावर पिक विमा काढल्याचे समोर आले. अशा बोगस विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
