Health News : अॅपेन्डिसायटिस दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते, काय आहेत लक्षणे?
Health News : अॅपेन्डिसायटिस ही सामान्य समस्या असली तरी, या स्थितीबाबत फार कमी जागरुकता आहे. ओटीपोटात दुखणे, मळमळ, ताप आणि उलट्या हे अॅपेन्डिसायटिसची काही प्रमुख लक्षणं आहेत. याकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं.

Health News : अॅपेन्डिसायटिस (Appendicitis) ही सामान्य समस्या असली तरी, या स्थितीबाबत फार कमी जागरुकता आहे. ओटीपोटात दुखणे, मळमळ, ताप आणि उलट्या हे अॅपेन्डिसायटिसची काही प्रमुख लक्षणं आहेत. याकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं. कारण अॅपेन्डिक्सचं (Appendix) वेळीच निदान व उपचार न झाल्यास अॅपेन्डिक्स फुटल्याची शक्यता अधिक असते. यामुळे इफेक्शन होऊन रुग्णाला प्राण गमवावे लागू शकते.
अॅपेन्डिसायटिस ही अॅपेन्डिक्सची सूज आहे. जी पोटाच्या उजव्या खालच्या भागात मोठ्या आतड्याची एक लहान थैलीसारखी रचना आहे. ओटीपोटात वेदना होण्याचे हे सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. यावर शस्त्रक्रियेद्वारे अॅपेन्डिक्स काढून टाकणं हा एकमेव उपाय आहे.
अॅपेन्डिसायटिसची लक्षणे
सध्या सर्व वयोगटांमध्ये अॅपेन्डिसायटिसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत. याचं वेळीच निदान झाल्यास उपचार करणं सहज शक्य आहे. परंतु, बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. तर काहींना या आजाराच्या लक्षणांबद्दल पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अॅपेन्डिसायटिसबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं खूप गरजेचं आहे. अचानक नाभीभोवती तीव्र वेदना जाणवणं, उजव्या बाजूला खाली ओटीपोटात दुखणं, वारंवार खोकला आणि चालताना थकवा जाणवणं ही अॅपेन्डिसायटिसची लक्षणं आहेत.
अॅपेन्डिसायटिसचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या आणि प्रक्रियांचा वापर केला जातो आणि रोगनिदानामध्ये प्रतिजैविकांच्या डोसचा कोर्स समाविष्ट आहे आणि त्यानंतर अॅपेन्डिक्स काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते.
तज्ज्ञ डॉक्टरांनुसार, जठरांच्या आजारांमध्ये आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियेपैकी 3 ते 5 टक्के तीव्र अॅपेन्डिसायटिसचा समावेश होतो. लहान मूल, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्येही ही समस्या दिसून येते. मुख्यतः ही समस्या 15 ते 30 वर्ष वयोगटात प्रामुख्याने आढळते. अॅपेन्डिक्सच्या अस्तरात अडथळा निर्माण होऊन संसर्ग होऊ शकतो हे अॅपेन्डिसायटिसचे बहुधा कारण आहे. कोविड महामारीच्या काळात अॅपेन्डिसायटिसचे प्रमाण कमी आढळून आले होते आणि याचे कारण जीआय स्वच्छता चांगली ठेवल्याने GI लक्षणे कमी दिसून येतात.
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
ओटीपोटात वेदनादायक अस्वस्थता, मळमळ आणि फुगल्यासारखे वाटत असल्यास किंवा ताप आणि थंडी वाजून भूक न लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण रक्त गणना (CBC), मूत्र तपासणी, पोटाचा अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन किंवा एमआरआय यासारख्या चाचण्यांचा सल्ला दिला जातो. आतड्यांचा तीव्र दाह झाल्यास डॉक्टर लॅप्रोस्कोपिक पद्धतीने अॅपेन्डिक्स काढून टाकण्याचा सल्ला देऊ शकतात, जेणेकरुन वेदना कमी होऊन रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
- डॉ. पंकज गांधी, लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन, एसआरव्ही हॉस्पिटल गोरेगाव
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
