Bhaiyyaji Joshi on Marathi: 'मुंबईत मराठी येणं गरजेचं नाही', भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर घाटकोपरचे भाजपचे मराठी आमदार म्हणाले...
Bhaiyyaji Joshi on Marathi: घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. मुंबईत अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. त्यामुळे मुंबईत मराठी भाषा येणे गरजेचे नाही, असे भय्याजी जोशी यांनी म्हटले.

मुंबई: मुंबईत प्रत्येकाला मराठी भाषा येणे गरजेचे नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मुंबई उपनगरातील विद्याविहार परिसरातील कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते. हा परिसर घाटकोपर विधानसभा मतदारसंघाला लागून आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी भय्याजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते गुरुवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भय्याजी जोशी हे वंदनीय आणि आदरणीय आहेत. त्यांचे वक्तव्य तोडूनमोडून दाखवण्यात आले. भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यामागील भाव समजून न घेता काही लोक टोकाचा अर्थ काढत आहेत. भय्याजी जोशी असं म्हणाल केी, घाटकोपरच्या काही भागात गुजराती भाषा बोलणारे अधिक लोक राहतात. त्यामुळे ते स्वाभाविकपणे आपापसात भेटले की गुजराती बोलतात. मुंबईची भाषा कालही मराठी होती, आजही मराठी आहे, उद्याही मराठीच राहील. आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबईची भाषा मराठीच असेल, असे राम कदम यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर काय म्हणाले?
भय्याजी जोशींचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते मी ऐकून त्यावर मी बोलेन. मुंबईतील आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, त्याला समजली पाहिजे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तोच इतरांच्या भाषेवर प्रेम करु शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आदित्य ठाकरेंचा भय्याजी जोशींवर हल्लाबोल
भय्याजी जोशी यांचं कालचं वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान केला आहे. राज्य सरकारने मरीन ड्राईव्हवरील मराठी भवन आणि गिरगावमधील दालन देखील रद्द केलंय. निवडणुकांनंतर अभिजात भाषेचा दर्जा दिला असं सांगितलं. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. भय्याजी जोशी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
भय्याजी जोशी नेमकं काय म्हणाले?
मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येकजण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येकजण काम करतो. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावे, असे भय्याजी जोशी यांनी म्हटले होते.
आणखी वाचा























