Pune Crime Swargate depot: नराधम दत्तात्रय गाडेचा खाकी गणवेश पुणे पोलीस दलातील कॉन्स्टेबलचा? चौकशीत सत्य समोर येणार
Pune crime news: पुण्यातील स्वारगेट डेपोत 25 फेब्रुवारीला एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला होता. शिवशाही बसमध्ये या तरुणीवर बलात्कार करण्यात आला.

पुणे: स्वारगेट एसटी आगारात 26 वर्षांच्या तरुणीच्या शरीराचे लचके तोडणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा पोलिसांच्या खाकी गणवेशात दिसत आहे. हा गणवेश पोलीस कॉन्स्टेबलचा असल्याची माहिती समोर येत आहे. या फोटो समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दत्तात्रय गाडे याच्यासारख्या सराईत गुन्हेगाराकडे पोलिसांचा (Pune Police) गणवेश कसा आला, हा सवाल उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर आता दत्ता गाडे याच्याकडे पोलिसी गणवेश कुठून आला, यासाठी आज दुपारी गुन्हे शाखा त्याची चौकशी केली जाणार आहे. दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आज दुपारी या फोटोबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. पोलीस दलातील कोणत्या कॉन्स्टेबलचा हा गणवेश आहे, याची माहिती घेतली जाणार आहे.
दत्तात्रय गाडे एका राजकीय पक्षातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता आहे. त्याचे राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी संबंध होते. त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या चौकशीतून काय समोर येणार, हे बघावे लागेल.
दत्ता गाडे याला गेल्यावर्षी स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमधे पोलिसांच्या गणवेशातील फोटो आढळून आला होता. चौकशी केल्यानंतर याबाबतचा आणखी तपशील समोर आला होता. आपण पोलीस आहोत अशी बतावणी करुन पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो, असे सांगत दत्ता गाडे अनेक मुलींशी ओळख वाढवायचा . दत्ता गाडे याने परिधान केलेला हा पोलिसाचा गणवेश नक्की कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याचा होता की त्याने तो शिवून घेतला होता, याचा तपास होण्याची गरज आहे. अशाप्रकारे गणवेश घालुन एक आरोपी जर गुन्हे करत होता तर पोलीसांच्या ही बाब लक्षात आली नाही का असाही प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे आता दत्तात्रय गाडेच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कधी कंडक्टर, कधी पोलीस, दत्तात्रय गाडे पुण्यातील तरुणींना कसं फसवायचा?
दत्तात्रय गाडे हा स्वारगेट आणि आजुबाजूच्या परिसरात पोलीस असल्याचे सांगून अनेक तरुणींना फसवायचा, अशी चर्चा होती. मात्र, आता दत्तात्रय गाडे याचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर आल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, , दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर वारंवार जात असावा. त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. 26 वर्षीय तरुणीवरील बलात्काराच्या या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलीस असल्याचे भासवायचा. पोलिसांच्या गणवेशाचा गैरवापर घेऊन त्याने आणखी कोणत्या तरुणींवर अत्याचार केले आहेत का, याचा शोध पोलिसांकडून सध्या घेतला जात आहे.
आणखी वाचा























