भैय्याजी जोशींनी वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं, आज कळलं असेल बुलेट ट्रेन कोणासाठी; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या भैय्याजींवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
मराठी बोलणार नाही अशी दादागिरी सुरु असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी सुरेश जोशी यांनी मुंबईमध्ये बोलताना घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे म्हणत आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे.

Aaditya thackeray on Suresh Bhaiyyaji Joshi : महाराष्ट्राची मायबोली मराठी असतानाही आणि भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्राची राजभाषा मराठी असतानाही महाराष्ट्रामध्ये सर्रास मराठी भाषेचे लचके तोडले जात आहेत. मराठी कुटुंबांवरही मुंबईत प्रहार केले जात आहेत. मराठी बोलणार नाही अशीही दादागिरी सुरु असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी सुरेश जोशी यांनी काल (5 मार्च) मुंबईमध्ये बोलताना घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे म्हणत आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदा हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य असल्याचे म्हणथ जोशी यांच्यावर घणाघाती प्रहार केला.
आज कळलं असेल की बुलेट ट्रेन कोणासाठी करत आहेत
आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून हल्लाबोल करत आज कळलं असेल की बुलेट ट्रेन कोणासाठी करत आहेत, असा जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की काल भैय्याजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं. हा महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान आहे. निवडणुकीनंतर अभिजात भाषेत दर्जा दिला गेला असं सांगितलं गेलं. मरीन ड्राईव्हवरील मराठी भवन आणि गिरगावमधील दालन देखील रद्द केलं आहे. इतकेच नव्हे तर भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर यांनी महापुरुषांचा अपमान केला अशी टीका सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे त्यामुळे सुरेश जोशींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. खरंच मुख्यमंत्री असतील तर त्यांचे उत्तर काय असेल? याची अपेक्षा असल्याचे सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले.
संजय राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, संजय राऊत यांनी भाजप आणि आरएसएसला भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून हल्लाबोल केला. भाजप नेते, धोरणकर्ते आणि संघाचे नेते भैय्याजी जोशी यांचा उल्लेख करत त्यांनी आव्हान दिले की, तुम्ही लखनऊमध्ये असे काही बोलू शकता का? राऊत म्हणाले, 'ते (भैय्याजी) काल महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आले होते. येथे आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राजधानीची भाषा मराठी नसल्याचे जाहीर केले. मराठीशिवाय कोणीही इथे येऊन राहू शकतो आणि काम करू शकतो. असे विधान करण्याचा अधिकार तुम्हाला (भैय्याजी जोशी) कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले की, कोलकात्यात जाऊन म्हणू शकता का की कलकत्त्याची भाषा बंगाली नाही? कोची आणि त्रिवेंद्रमला जाऊन इथली भाषा मल्याळी नाही असं म्हणता येईल का? तुम्ही लखनौला जाऊन योगीजींसमोर उभे राहून लखनऊची भाषा हिंदी नाही असे म्हणू शकता का? पाटण्याला जाऊन नितीश कुमारांसमोर पटणाची भाषा हिंदी नाही असे म्हणता येईल का? चेन्नईला जाऊन इथली भाषा तामिळ किंवा तेलगू नाही असे म्हणता येईल का? पंजाबमध्ये जाऊन इथली भाषा पंजाबी नाही असे म्हणता येईल का? मराठी भाषेसाठी बलिदान दिले आहे. आमचे लोक शहीद झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य स्थापन केले. त्यांची भाषा मराठी होती.
इतर महत्वाच्या बातम्या



















