Aai Tuljabhavani : उदे गं अंबे... आई तुळजाभवानी देवीचं हुबेहुब रुप साकारण्याचा प्रयत्न
Ude Ga Ambe TV Serial : स्टार प्रवाहवर कथा 'उदे गं अंबे... कथा साडे तीन शक्तीपिठांची' मालिका 11 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
Ude Ga Ambe TV Serial : नवरात्रौत्सवाच्या शूभ मुहूर्तावर स्टार प्रवाहवर ‘उदे गं अंबे... कथा साडे तीन शक्तीपिठांची’ या मालिकेच्या रुपात आई तुळजाभवानीची कथा घराघरांत पोहोचणार आहे. या मालिकेच्या रुपात अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्तीच भक्तांच्या घराघरात अवतरणार आहे. महाराष्ट्राची श्रद्धास्थाने असलेल्या साडेतीन शक्तीपिठांची अभुतपूर्व गोष्ट भव्यदिव्य मालिकेच्या माध्यमातून सादर करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न आहे.
देवीचं हुबेहुब रुप साकारण्याचा प्रयत्न
'उदे गं अंबे' मालिकेचे निर्माते महेश कोठारे आणि त्यांच्या पत्नी नीलिमा कोठारे आहेत. देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी निर्माते महेश कोठारे यांच्या पत्नी नीलिमा कोठारे आणि त्यांच्या सहकारी नीता खांडके यांनी सर्वात महत्त्वाचं योगदान दिलं. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी देवीचे दागिने बनवून घेतले. देवीचं रुप साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. देवीनेच आमच्याकडून हे करवून घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उदे गं अंबे... कथा साडे तीन शक्तीपिठांची
देवीचा मुकुट, कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कंबरपट्टा, तोडे, बाजुबंद, हार, कंठी, कुंडले या अलंकारांना फार महत्त्व आहे. हे सगळे अलंकार परिधान केलेल्या देवीचं हुबेहुब रुप डोळ्यासमोर आल्यावर आपल्या निशब्द करुन टाकतं. उदे गं अंबे ही मालिका करण्याचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर आम्ही दागिन्यांची शोधमोहिम सुरु केली. देवीसाठी लागणाऱ्या साड्या देखिल खास बनवून घेण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
कुलस्वामिनी आदिशक्ती भक्तांच्या घराघरात अवतरणार
आदिशक्तीचं रुप साकारणारी अभिनेत्री मयुरी कापडणेला जेव्हा आम्ही देवीच्या रुपात पाहिलं, तेव्हा आम्हालाही साक्षात देवी समोर असल्याचा भास झाला. माहूरची देवी रेणुका, तुळजापूरची देवी भवानी माता कोल्हापूरची देवी अंबाबाई आणि वणीची देवी सप्तशृंगी ही देवीची चार वेगळी रुपं मालिकेसाठी घडवण्याची संधी मिळणं हा देवीचाच आशीर्वाद आहे, अशी भावना नीलिमा कोठारे आणि नीता खांडके यांनी व्यक्त केली.
जगतजननी आई तुळजाभवानी
आदिशक्तीचं स्वरूप विराट आणि विश्वाकार आहे. ती जगतजननी आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी भक्तांची तारणहार आहे आणि म्हणूनच या साडेतीन शक्तिपीठांचा महिमा अपार आहे. याच साडे तीन शक्तीपीठांची सविस्तर भावगर्भ आणि भक्तिरसपूर्ण कहाणी पाहायला विसरु नका दुर्गाष्टमीपासून म्हणजेच 11 ऑक्टोबरपासून सायंकाळी 6.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
महत्त्वाच्या इतर बातम्या :